शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 12, 2017 00:42 IST2017-07-12T00:42:45+5:302017-07-12T00:42:45+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्याची ‘धान उत्पादक तालुका’ म्हणून ओळख आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली.

शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा
दुबार पेरणीचे संकट : सिंदेवाही तालुक्यात धानपीक धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्याची ‘धान उत्पादक तालुका’ म्हणून ओळख आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. आता शेतकरी दमदार पावसाची वाट बघत असल्याचे चित्र आहे.
मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या रोपाची नासाडी झाली. मुरुम व वारवशी जागेवरचे रोपे सुकली. त्यांना दुबार पेरणी करावी लागेल. तीन नक्षत्रे कोरडी गेल्यावर रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पऱ्ह्यांना दिलासा मिळाला. ज्या शेतकऱ्यांकडे मोटरपंप व इतर सिंचन व्यवस्था आहे, त्यांनी पऱ्ह्यांना पाणी दिले. पण जे शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आहे, त्या शेतकऱ्यांची पऱ्हे सुकले, आता फक्त पऱ्हे जगविण्याचे काम सुरु आहे. पावसाअभावी धानपीक धोक्यात आले असून आता दमदार पावसाची गरज आहे.
या तालुक्यातील तलाव, बोड्या शेततळे अद्यापही कोरडे असून नदी-नाल्यांना पाणी नाही. ज्या शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची सिंचन व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना यावर्षी उत्पादनापासून मुकावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात १०० टक्के शेतकऱ्यांची धान पेरणी झालेली आहे. आता शेतकरी रोवणी करण्याच्या प्रतीक्षेत आहे. येथील गडमौशी तलाव पाहिजे त्या प्रमाणात भरलेले नाही. त्यामुळे ३०० हेक्टरवरील धान पऱ्हे रोवणीच्या प्रतीक्षेत आहेत. रोवणी झाली म्हणजे पिके हाती येत नाहीत. त्याला जोरदार पावसाची गरज आहे.