पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेला पूर्णत्वाची प्रतीक्षा
By Admin | Updated: December 14, 2015 01:15 IST2015-12-14T01:15:48+5:302015-12-14T01:15:48+5:30
बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना कळमना गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तिरावर बांधकामाधीन आहे.

पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेला पूर्णत्वाची प्रतीक्षा
सुरेश रंगारी कोठारी
बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना कळमना गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तिरावर बांधकामाधीन आहे. या योजनेस ८ नोव्हेंबर २०११ ला सन १९९९-२००० चे दरसूचीनुसार १९३१.५३ लक्ष साठी प्रशासकीय मान्यता व ३० जानेवारी २००९ ला सन २००८-०९ चे दरसुचीनुसार ७०३७.८८ लक्ष किमतीच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावास विदर्भ पाटबंधारे विभाग मंडळ नागपूरद्वारे मान्यता मिळाली. ११ डिसेंबर २०११ ला या योजनेच्या प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ झाला. मात्र सध्याची कामाची स्थिती पाहता, उपसा सिंचन योजना कधी पूर्ण होईल, हे सांगता येणे कठीण आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील हे सिंचन प्रकल्प एकमेव असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बल्लारपूर तालुक्यातील दहा गावे सुजलाम-सुफलाम होणार आहेत. या योजनेतून ३ हजार ६९९ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. या भागातील शेती केवळ निसर्गाच्या भरवश्यावर असून प्रकल्पाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
सध्या स्थितीत या योजनेच्या जॅलवेल, पंपहाऊस व उध्वनलिकेचे काम प्रततीपथावर आहे. तसेच उजवा व डावा मुख्य कालव्याचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यापैकी ४०० ते ५०० मिटर कालव्याचे काम शिल्लक आहे. या भागातील शेत जमीन उत्तम दर्जाची असून कोरडवाहू शेतकऱ्यांना हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. गेली १५ वर्षांपासून या प्रकल्पाच्या लाभासाठी शेतकरी तळमळीत आहे. या प्रकल्पाच्या पंपहाऊस व जॅवेलचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून पंपमशीन ४ बाय २८५ अशक्ती प्रकल्प ठिकाणी फिटींगसाठी आल्या आहेत. या प्रकल्पाला लागणारी विजेची कामे पूर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पामुळे खरीप २ हजार ३९८ हे व रब्बी १ हजार ३०१ हे शेती सिंचीत होणार आहे. अजूनपर्यंत या प्रकल्पाचा वितरण हौदाचे कामास सुरूवात झाली नाही. मात्र या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा दावा करीत आहेत.
पळसगाव- आमडी उपसा सिंचन प्रकल्पाचे कामे येत्या जून-जुलैमध्ये पूर्ण होणार असून प्रकल्पात आवश्यक निधीचा पुरवठा वेळोवेळी होत आहे. कोणत्याही विभागाकडून प्रकल्पबाधीत होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. येत्या हंगामात प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत २० टक्के काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकारी सांगतात.
कालव्याचे
काम निकृष्ट
या प्रकल्पाच्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक कामे अंदाजपत्रकात नमूद असल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे करण्यात आली नाहीत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाला तरीही भविष्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ३९९८ हे असून बल्लारपूर तालुक्यातील बामणी, दुधोली, दहेली, जोगापूर, कोर्टीतुकूम, कोर्टीमक्ता, कळमना, आमडी व पळसगाव या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.