परवान्यासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 19, 2016 00:38 IST2016-01-19T00:38:48+5:302016-01-19T00:38:48+5:30
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपूर मार्फत सहा महिन्यांपूर्वी ब्रह्मपुरी येथे चालक परवाना शिबिर घेण्यात आले.

परवान्यासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा
आरटीओ विभागाचा भोंगळ कारभार : विभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपूर मार्फत सहा महिन्यांपूर्वी ब्रह्मपुरी येथे चालक परवाना शिबिर घेण्यात आले. मात्र या शिबिरात सहभागी अनेकांना सहा महिने लोटूनही चालक परवाने न दिल्याचा भोंगळ कारभार आरटीओ विभागात उजेडात आला आहे.
११ मे २०१५ रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपूर मार्फत ब्रह्मपुरी येथे चालक परवाना शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील अनेकांनी हलके वाहन चालविण्यासाठी पक्के परवाना मिळण्यासाठी अर्ज केले. शिबिरात नियमानुसार वाहन चालविण्याची चाचणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमक्ष घेण्यात आली. यात अनेक जण पात्र ठरले. चाचणीत पात्र ठरलेल्यांना काही दिवसांत हलके वाहन चालविण्याचा परवाना देणे आवश्यक होते.
मात्र सहा महिने लोटूनही शिबिरात चाचणी देणाऱ्यांना चालक परवाने देण्यात आलेले नाही. त्यामुळे चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याबाबत ब्रह्मपुरी येथील राजेश आनंदराव गजपूरे, संतोष तिडके, मोहित चंदनखेडे, अशोक पातोडे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागितली आहे. यात त्यांनी परवाने वाटप करण्यास दिरंगाई का होत आहे, या सर्व प्रकरणाला जबाबदार अधिकारी कोण आहे, दिरंगाई करणाऱ्यांवर काय कारवाई करणार आदी माहिती मागितली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अधिकारी या प्रकरणाची काय दखल घेतात याकडे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)