विठ्ठल-रुखमाई पालखीची शोभायात्रा
By Admin | Updated: July 30, 2015 01:00 IST2015-07-30T01:00:46+5:302015-07-30T01:00:46+5:30
आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल मंदिर देवस्थान कमेटी किल्ला वार्ड भद्रावतीतर्फे मंगळवारी विठ्ठल रुखमाई पालखीच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

विठ्ठल-रुखमाई पालखीची शोभायात्रा
भद्रावती नगरी दुमदुमली : विविध कार्यक्रमात नागरिकांचा सहभाग
भद्रावती : आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल मंदिर देवस्थान कमेटी किल्ला वार्ड भद्रावतीतर्फे मंगळवारी विठ्ठल रुखमाई पालखीच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
ढोल ताश्यांच्या गजरात, टाळ, विणा, मृंदग वाजवित वारकरी, भक्तगण जय जय रामकृष्ण हरी..., ज्ञानोबा तुकाराम म्हणत नाचत गात पुढे सरकत होते. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग... यामुळे जणू काही भद्रावतीत पंढरीच अवतरली असा भास होत होता.
शोभायात्रेत लोकमान्य विद्यालय भद्रातीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सादर केलेले लेझीम पथक, वाड व वेगवेगळ्या झाक्या आकर्षित करुन टाकणाऱ्या होत्या. शोभायात्रेला विठ्ठल मंंदिरातून सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. विठ्ठल मंदिर ते जवळे प्लॉट, वाल्मिकी चौक, जुने बसस्थानक, गांधी चौक, पोलीस ठाणे व शेवटी शोभायात्रेची विठ्ठल मंदिर येथे सांगता झाली. पालखी शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढून भाविकांनी पालखीचे स्वागत केले. पूजाअर्चाही करण्यात आली. यावेळी सगळ्या भक्तगणांनी पावसासाठी साकडे घातले.
शोभायात्रेत विविध भजन मंडळ सहभागी झाले होते. शोभायात्रेत श्री विठ्ठल मंदिर देवस्थान कमेटीचे चंद्रकांत गुंडावार, विठ्ठल पारधे, वसंत लोणकर, गोपाल ठेंगणे, प्रा. सुरेश परसावार, प्राचार्य विनोद पांढरे, चंद्रकांत देशपांडे, नामदेव कोल्हे, उल्हास भास्करवार, विठ्ठल देठे, अतकरी महाराज, गारघाटे, अनिल पिट्टलवार, सुलभा मद्दीवार तसेच लोकमान्य विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक तसेच भक्तगण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दुपारी कीर्तन व गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)