विसापूरच्या प्रविणाने केली प्रतिकूलतेवर मात
By Admin | Updated: June 15, 2017 00:29 IST2017-06-15T00:29:59+5:302017-06-15T00:29:59+5:30
घरातील परिस्थिती जेमतेम. वडिल आॅटो चालक. आई मोलमजुरी करणारी, अठराविश्व दारिद्र्याचा सामना करणारे चौघांचे कुटुंब.

विसापूरच्या प्रविणाने केली प्रतिकूलतेवर मात
दहावीत मिळविले ९५ टक्के गुण : आॅटो चालकाच्या मुलीची भरारी
अनेकश्वर मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : घरातील परिस्थिती जेमतेम. वडिल आॅटो चालक. आई मोलमजुरी करणारी, अठराविश्व दारिद्र्याचा सामना करणारे चौघांचे कुटुंब. झोपडीवजा राहते घर, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने ती दहावीच्या परीक्षेला सामोरे गेली. मंगळवारी लागलेल्या दहावीच्या निकालात भरारी घेत तिने ९४.८० टक्के गुण मिळविले. ही किमया विसापूर येथे राहणारी बल्लारपूरच्या आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलची प्रविणा प्रमोद उमरे या विद्यार्थिनीने केली.
बल्लारपूर तालुक्यातील प्रमोद उमरे व त्याची पत्नी विश्रांती दोघेही पदवीधर आहेत. मात्र परिस्थितीच्या तगाद्यामुळे जीवनात संघर्ष आला. प्रमोदच्या नशिबी आॅटो तर विश्रांतीच्या पदरात मोलमजुरी आली. तरीही दोन मुलीवर त्याचे जीवापाड प्रेम. मोठी मुलगी प्रविणा व धाकटी मुलगी अनुजा यांना शिक्षणाची आवड असल्याने पदरमोड करून शिक्षणाचे धडे दिले.
प्रविणा ही पहिल्या वर्गापासून बल्लारपूर येथील आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. प्रविणाला घरातील परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे अभ्यास करताना तिने प्रयत्नाला इच्छाशक्तीचे बळ दिले. काळोख्या रात्रीनंतर सोनेरी पहाट आपली वाट पाहते. याप्रमाणे ध्येयाचे मार्गक्रमण तिने सुरू केले. वेळेचे नियोजन व प्रामाणिक प्रयत्नातून अभ्यासात सातत्य राखले. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत प्रविणाने प्रतिकूल परिस्थितीला बाजुला सारून घवघवीत यश संपादन केले.
तिला एकुण ५०० गुणांपैकी ४७४ गुण प्राप्त झाले असून टक्केवारी ९४.८० इतकी आहे. इंग्रजीत १०० पैकी ९०, मराठीत ८६, हिंदी विषयात ८९, गणित विषयात १०० पैकी १००, सायन्स व टेक्नालॉजी १०० पैकी ९७ तर सामान्य विज्ञान विषयात १०० पैकी ९८ गुण तिने मिळविले आहे.
आई-वडिलांच्या ईच्छापूर्तीसाठी होणार डॉक्टर
प्रविणाच्या आईवडिलांचे जीवन कष्टमय आहे. परिस्थितीने तसे वळण दिल्याने पदवीधर असूनही त्यांना नोकरी मिळविता आली नाही. उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर असताना आईवडिलांची मुलीच्या शिक्षणासाठी धडपड सुरू आहे. परिस्थितीचे अपयश पचवून नशिबाला दोष न देता प्रयत्नरत राहून शिक्षणानाला परिश्रमाची जोड देणाऱ्या आईवडिलांच्या ईच्छापूर्तीसाठी व सामाजिक ऋण फेडण्यासाठी समाजसेवा हातून घडावी म्हणून प्रविणाने भविष्यात डॉक्टर होण्याची ईच्छा बाळगून आहे. त्यासाठी ती आतापासून तयारीला लागली आहे.
दृढ निश्चयातून गाठले यश
बल्लारपूर येथील आयडीयल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रविणा उमरे पहिल्या वर्गापासून शिक्षण घेत आहे. तिचा शैक्षणिक प्रवास परिस्थितीच्या कधी आड आला नाही. दृढ निश्चिय बाळगून शैक्षणिक सत्रातील अभ्यासात तिने सातत्य राखले. काही काळासाठी शिकवणी लावली. एकाच शाळेत असणाऱ्या प्रविणा आणि अनुजा दोन्ही बहिणी अभ्यासात एकमेकींच्या मदतीला होत्या. अनुजा ही त्याच शाळेत नवव्या वर्गात असून तिही कुशाग्र बुद्धीची आहे. तिच्याकडूनही बहिणीसारखीच प्रगतीची अपेक्षा आहे.