चिंतलधाबा येथे ‘व्हायरल फ्लू’चे थैमान
By Admin | Updated: March 21, 2016 00:37 IST2016-03-21T00:37:40+5:302016-03-21T00:37:40+5:30
वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील ...

चिंतलधाबा येथे ‘व्हायरल फ्लू’चे थैमान
मुले व वृद्धांसह ५० जणांना ग्रासले
पोंभुर्णा : वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील जवळपास ५० नागरिकांना ‘व्हायरल फ्ल्यू’ची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना खाटेवरून उटणेही शक्य होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा या गावामध्ये शनिवारी २४ रुग्णांना व्हायरल फ्ल्यूची लागण झाली. त्यात त्यांना पायाच्या घुडग्याच्या जाईंडमध्ये दुखणे, पाय सरळ न होणे अशाप्रकारची लक्षणे सुरू झाली. दुसऱ्या दिवशी रविवारी परत २६ रुग्णांची वाढ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यात लहान मुलांपासून तर वृद्धांना व्हायरल फ्ल्यूने ग्रासले आहे. गावातील एका इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला सुद्धा आजाराने ग्रासले असल्याने त्याला खाटेवरून उठणे कठीण झाले आहे. ‘त्या’ विद्यार्थ्यांचा मंगळवारी दहावीचा शेवटचा पेपर आहे. परीक्षेला न गेल्यास त्याचा शैक्षणिक वर्ष वाया जाईल की काय, अशी कुटुंबातील व्यक्तींमध्ये भीती निर्माौण झाली आहे.
व्हायरल फ्ल्यूने ग्रस्त रूण खाटेवरून उठू शकत नसल्याने पोंभूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना या बाबीची गावकऱ्यांनी माहिती दिली. परंतु, या ठिकाणी डॉक्टर न येता एमपीडब्ल्यू व परिचारिकेच्या माध्यमातून गावातील समाजभवनामध्ये तात्पुरता उपचार सुरू केले आहे. मात्र आरोग्य विभागाकडून पाहीजे तसे उपचार मिळत नसल्याने काही रुग्ण खासगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
पाथरी परिसरात अतिसारची लागण
पाथरी येथे नळाच्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. दररोज तीन ते चार रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी येथे उपचाराकरीता येत आहेत. मात्र योग्य औषध साठा उपलब्ध नसल्याने काहींना रुग्णांना गडचिरोली हलविले आहे.
गावकरी म्हणतात, चिकनगुणिया
आरोग्य विभागाचे कर्मचारी व्हायरल फ्ल्यू म्हणून सांगत असले तरी गावकरी मात्र सदर साथ ही चिकनगुणियाची असल्याचे सांगत आहेत. रूग्णांमध्ये पुन्हा वाढच होत असून रुग्णांचे हातपाय धरले तरी तो खाटेवरून उठू शकत नाही. रुग्णाला उठवल्यावर चालता येत नाही. त्यामुळे या गावातील अनेक रुग्ण खाटेवरच पडून असल्याचे वास्तव दिसत आहे. या प्रकाराकडे आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते राजाराम मोहुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चिंतलधाबा येथे व्हायरल फ्ल्यूची लागण झाली आहे. व्हायरल फ्ल्यू हा विषाणूजन्य आजार असून रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. चिंतलधाबा गावात आरोग्य कॅम्प लावण्यात आले असून आजारग्रस्तांच्या रक्ताचे नमूने घेतले जात आहेत. गावकऱ्यांनी भीती बाळगू नये, ही परिस्थीती दोन दिवसांत दूर होईल.
- डॉ. विलास धनगे, वैद्यकीय अधिकारी, पोंभुर्णा.