प्रवासी वाहनातून नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:35+5:302021-07-20T04:20:35+5:30
घोसरी : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष ...

प्रवासी वाहनातून नियमांचे उल्लंघन
घोसरी : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभूर्णा तालुक्यातील नांदगाव -गोंडपिपरी, पोंभूर्णा- चंद्रपूर मार्गावर हा प्रकार सुरू आहे.
केरोसिनअभावी अडचण वाढली
जिवती : केरोसिनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसिन बंद झाल्याने अडचण जात आहे. केरोसिन पुरविण्याची मागणी आहे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
वढोलीत पांदण रस्त्याची दैनावस्था
वढोली : बोरगाव पुलाकडून निघणारा ताराचंद कोपुलवार ते विश्वनाथ चूदरी यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदन रस्त्यावर खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य व मोठे खड्डे तयार झाले असून आवागमन करणाऱ्यांना त्रास होत आहे.
माणिकगड परिसरात पर्यटन सफारी सुरू करा
कोरपना : निसर्ग व वन संपदेने नटलेल्या माणिकगड परिसरात वन विभागाने पर्यटन सफारी सुरू करावी. तसेच येथील पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. यामुळे रोजगार मिळणार आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले
पिंपळगाव (भो) : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने जनसामान्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. सप्टेंबरपासून काही प्रमाणात सुरळीत सुरू झाले; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्यावाढीला लागल्याने मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी महागाई वाढली आहे.
रोपवाटिका योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा
बल्लारपूर : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत राबविली जात आहे. या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना भाजीपाला रोपवाटिका उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात मिळणार आहे. या योजनेमधून सर्वसाधारण प्रवर्गातून एका शेतकऱ्यास लाभ देण्यात आलेला असून अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्त न झाल्याने कृषी विभागाने अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी केले आहे.