ग्रामरोजगार सेवकाला होणार अटक
By Admin | Updated: August 5, 2015 01:17 IST2015-08-05T01:17:48+5:302015-08-05T01:17:48+5:30
तालुक्यातील पिंपळगाव (भो.) येथे झालेल्या मनरेगाच्या कामातील भ्रष्टाचारप्रकरणी संबंधित ग्रामरोजगार सेवकाला अटक होण्याची शक्यता आहे.

ग्रामरोजगार सेवकाला होणार अटक
ब्रह्मपुरी : तालुक्यातील पिंपळगाव (भो.) येथे झालेल्या मनरेगाच्या कामातील भ्रष्टाचारप्रकरणी संबंधित ग्रामरोजगार सेवकाला अटक होण्याची शक्यता आहे. या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अन्य लोकांना वाचविण्यासाठी प्रशासनस्तरावर केविलवाणी धडपड केली जात असल्याने मजुरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणात संबंधित ग्राम रोजगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भ्रष्टाचाराची चौकशी ग्रामपंचायतीच्या खुल्या प्रांगणात ग्रामवासीयांसमोर करण्यात आली. चौकशी दरम्यान, गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी २५४ बोगस मजुरांची नावे व त्यांच्या नावावर २ लाख ६४ हजार ९४४ रुपयांची अफरातफर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच या भ्रष्टाचारात सरपंच हेमंत खोब्रागडे, ग्रामसेवक नानाजी मेश्राम, तांत्रिक सहाय्यक बळीराम मैंद, ग्रामरोजगार सेवक दिलीप उरकुडे, ग्राम रोजगार सहाय्यक तुळशिदास उरकुडे यांचाही सहभाग असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. मात्र आता केवळ ग्राम रोजगार सेवकालाच अटक होण्याची चिन्हे असून अन य आरोपी यातून सहिसलामत सुटणार असल्याचे दिसून येत आहे.
पिंपळगाव (भो) येथे मनरेगाच्या कामातील भ्रष्टाचाराची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. २५४ मजुरांची बोगस नावे दाखवून २ लाख ६४ हजार ८४४ रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सदर घोटाळ्यातील आरोपींवर जिल्हाधिकारी योग्य कारवाई करून न्याय देतील, अशी अपेक्षा होती. परंतु जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सदर प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. चोर सोडून सन्याशाला फाशी दिल्याचा प्रकार या प्रकरणात झाला असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. (वार्ताहर)