विहीरगाव ग्रामपंचायतीच्या मनरेगातील भ्रष्टाचार उघड

By Admin | Updated: October 15, 2015 01:24 IST2015-10-15T01:24:33+5:302015-10-15T01:24:33+5:30

सावली तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या विहीरगाव ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीचे रोजगार सेवक ...

The villagers of Vihargaon Gram Panchayat expose corruption in MNREGA | विहीरगाव ग्रामपंचायतीच्या मनरेगातील भ्रष्टाचार उघड

विहीरगाव ग्रामपंचायतीच्या मनरेगातील भ्रष्टाचार उघड


गेवरा : सावली तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या विहीरगाव ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीचे रोजगार सेवक तथा उपसरपंच यांनी एप्रिल २०१५पासून करण्यात आलेल्या अंबादास वाकडे ते बंधारा पर्यंत रोड बांधकामात (मनरेगा) मजुरांच्या मुळ हजेरीपत्रकात खोडतोड करुन कधीही कामावर न जाणाऱ्या मजुरांची तसेच राजकीय हितसंबंधातील व्यक्ती, नातेवाईक, अपंग, शालेय विद्यार्थी, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, याचे नाव पुढे करुन शासकीय निधीची अफरातफर केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
या संदर्भात ग्रामसभेत ग्रामसेवक, रोजगार सेवक व संबंधित बँक व्यवस्थापक, तत्कालीन पदाधिकारी यांच्यावर कारवाई करुन गुन्हे दाखल करावे व पद बरखास्त करण्याचा ठराव पारित केला आहे.
सदर ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच हेच रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. सत्ता केंद्रित व्यवहाराचा पंचायत समिती स्तरावरील राजकीय हितसंबंधाच्या प्रभावाचा वापर त्यांनी सुरू केला. मनरेगा कामात मनमर्जीतील बोगस मजुरांना राजकीय पदाचा दुरुपयोग करुन शासकीय निधीची खिरापत वाटून गैरप्रकारे विल्हेवाट लावून घेतली असल्याचा आरोप मजुरांनीच केला आहे. या मागील ग्रामपंचायत निवडणूकीपूर्वीपासून मजुरांच्या मनामध्ये असंतोष खदखदत होता. मागील १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत सदर ग्रामपंचायतीचे रोजगार सेवक यांनी याबाबत खुलासा करावा, असा अर्ज सादर केला. परंतु स्वत:च उपसरपंच असल्याने व तत्कालीन संपूर्ण ग्रामपंचायतीची सत्ता एककेंद्रीत असल्याने तत्कालीन सरपंचांनी वेळवरील विषयात चर्चा घडवून आणता ग्रामसभेतून फेटाळून लावला होता. परंतु स्थानिक मजुरांनी माहिती अधिकाराचा वापर करुन सदर कामाची माहिती प्राप्त करुन घेतली व सामूहिकपणे सदर हजेरीपत्रके मोजमाप पुस्तिका पडताळून पाहिली असता त्यामध्ये कथित प्रकार उघडकीस आला. रोजगार सेवक यांनी हजेरीपत्रकात पांढऱ्या शाईचा वापर करुन त्यामध्ये खोडतोड केल्याचे लक्षात आले. त्यामध्ये हजेरी पत्रक क्र. ३१८, ११३९, १८८२ यामध्ये कधीही कामावर गेले नसलेल्यांची नावे आढळली. अपंग व्यक्ती, शालेय विद्यार्थी, श्रावणबाळचे लाभार्थी, नातेवाईकांच्या नावासमोरील रकान्यातील दररोजची हजेरी, एकूण उपस्थिती, बँक खाते नंबर व मजुरी, यामध्ये खोडतोड केल्याचा प्रकार उघडला आहे. दर दिवशी एकूण मजुरांची उपस्थिती संख्या व एकूण बेरीज या संख्येत तफावत आढळून आलेली असल्याने यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. सदर मनरेगा कामाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर दंडात्मक, फौजदारी गुन्हे दाखल करावे व लुटलेली रक्कम शासन जमा करण्यासाठी निवेदन विभागीय आयुक्त नागपूर, अशोक नेते , विजय वडेट्टीवार जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. (वार्ताहर)

Web Title: The villagers of Vihargaon Gram Panchayat expose corruption in MNREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.