पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी गावकरी सरसावले
By Admin | Updated: June 17, 2017 00:43 IST2017-06-17T00:43:27+5:302017-06-17T00:43:27+5:30
कोरपना तालुक्यातील उपरवाही गावातील संजय भाऊराव दुरूटकर यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारला घडली.

पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी गावकरी सरसावले
माणुसकीचा हात : सिलिंडर स्फोटातील जखमींना आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील उपरवाही गावातील संजय भाऊराव दुरूटकर यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारला घडली. या घटनेत त्यांची पत्नी ज्योती दुरूटकर (२७) व मुलगी कोमल दुरूटकर (७) गंभीर जखमी झाल्या. सिलिंडरचा स्फोट भीषण असल्यामुळे, घर पूर्णपणे उद्धवस्त झाले. तसेच घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे दुरुटकर कुंटुब पूर्णपणे उघड्यावर आले. मात्र ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून गावकरी त्यांच्या मदतीला धावून आले. एक दानपेटी तयार करुन गावात फिरवून ३९ हजार २४० रुपयांची मदत जमा केली. व ती मदत दुरुटकर परिवारांच्या स्वाधीन केली.
संजय दुरूटकर हे उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीत ठेकेदारी पद्धतीत मजूर म्हणून काम करतात. त्यांना आठ एकर शेती आहे. नुकतीच खरिप हंगामाला सुरूवात झाली असल्याने त्यांनी शेतीसाठी नातेवाईकांकडून हातउसणे म्हणून एक लाख रुपये आणले होते. ती सर्व रक्कम त्यांनी घरीच ठेवली होती. मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी ज्योती या चबा करत असताना अचानक सिंलिडरचा स्फोट झाला. स्फोट भीषण असल्याने संपूर्ण घराला आग लागली. त्यामुळे घराचे छप्पर पूर्णपणे उडाले. तसेच घरातील आलमारीत ठेवलेले एक लाख रुपये व सोन्याच्या दोन अंगठी, गोप, घरातील दागिने व घरातील धान्य, घरघूती साहित्य जळून खाक झाले. आई व मुलगी जखमी झाल्या. या घटनेने दुरुटकर कुंटुब पूर्णपणे उघड्यावर आले. मात्र उपरवाही गाववासियांनी ‘एक हात मदतीच्या’ या उपक्रमातून दुरुटकर कुटुंबीयाच्या मदत पेठ्या तयार करुन बुधवारला गावामध्ये फिरुन दुरुटकर कुंटुबासाठी मदत मागितली. यावेळी गावकऱ्यांनी सढळ हाताने मदत केली. त्यामुळे या उपक्रमातून ३९ हजार २४० रुपयांची मदत गोळा केली. ती संपूर्ण मदत दुरुटकर परिवारांच्या स्वाधीन करुन दुरुटकर परिवाराला दिलासा दिला. या उपक्रमात संपूर्ण सुभाष बुराण, नंदकिशोर बावने, मारोति पानघाते, समाधन बल्कि, अशोक निखादे, मधूकर येवले, एकनाथ गोहोकार, वासूदेव बोंडे, बाळू मत्ते, निलकंठ कोंगरे, हरिदास पांगघाते, लोनगाडगे यांनी गावात फिरुन निधी गोळा केला.