गावकऱ्यांनो, लय भारी व्हा !
By Admin | Updated: December 31, 2015 01:07 IST2015-12-31T01:03:05+5:302015-12-31T01:07:16+5:30
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारावयाची आहे.

गावकऱ्यांनो, लय भारी व्हा !
सीईओंंचे आवाहन : स्वच्छता कार्ड लावण्याचा शुभारंभ
बल्लारपूर : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारावयाची आहे. यासाठी गावागावांत स्वच्छतेची व्यापक लोक चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. स्वच्छतेचे ध्येय गाठण्यासाठी गावकऱ्यांनो वैयक्तिक शौचालये बांधा. त्याचा वापर करा आणि लय भारी व्हा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मंगळवारी स्वच्छता कार्ड लावण्याचा शुभारंभादरम्यान गावकऱ्यांना केले.
बल्लारपूर पंचायत समितीच्या वतीने विदर्भात पहिल्यांदा तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ग्रामपंचायत विसापूरच्या हद्दीतील चुनाभट्टी गावात स्वच्छता कार्ड लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे, उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अॅड. हरीष गेडाम, पं.स. सदस्या सुमन लोहे, संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, जिल्हा परिषद स्वच्छता मिशनचे व्यवस्थापक संजय धोटे, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, अभियंता तृषांत शेंडे, बंडू हिरवे, प्रवीण खंडारे, विसापूरचे उपसरपंच सुनिल रोंगे, ग्रामपंचायत सदस्य अशोक थेरे, बुद्धीवामन कांबळे, विजय वैद्य, गट समन्वयक सुवर्णा जोशी, सुनिल नुत्तलवार यांची उपस्थिती होती.
दरम्यान, चुनाभट्टी येथे ७६ कुटुंबाच्या घराच्या दर्शनीभागात हिरव्या रंगाचे लय भारी स्वच्छता कार्ड लावून घरामध्ये शौचालय आहे, त्याचा वापर सर्वजण करतात तर ४ कुटुंबाच्या घरी शौचालय नसल्याने लाल रंगाचे धोका दर्शविणारे स्वच्छता कार्ड डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी लावले. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपूर तालुक्याची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल
बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत १७ ग्रामपंचायती आहेत. यात ९ हजार ९०६ कुटुंबांपैकी केवळ ५५० कुटुंबाकडे शौचालय नाहीत. येत्या मार्च अखेर संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी पंचायत समितीने नियोजन केलेले आहे. त्यानुसार मंगळवारी कोठरी, इटोली, नांदगाव (पो) व हडस्ती, बुधवारी गिलबिली, किन्ही, लावारी व कळमना, गुरुवारी पळसगाव, आमडी व कोर्टीमक्ता तर शुक्रवारी काटवली (बा), बामणी (दु), मानोरा, कवडजी व विसापूर येथील गावकऱ्यांत जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पथकात सभापती, उपसभापती, सदस्य, संवर्ग विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक यांचा समावेश राहणार असून तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला.
असे लावले जाते स्वच्छता कार्ड
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ज्या घरामध्ये शौचालय आहे व घरातील सर्व सदस्य त्याचा वापर करतात, त्यासाठी हिरव्या रंगाचे ‘लय भारी’. घरामध्ये शौचालय आहे. परंतु घरातील काही सदस्य शौचालयाचा वापर न करता उघड्यावर जातात. त्यासाठी पिवळ्या रंगाचे ‘फिफ्टी-फिफ्टी’, घरामध्ये शौचालय आहे. परंतु नादुरूस्त असल्यामुळे सर्व सदस्य उघड्यावर शौचास जातात. अशांच्या घरावर केसरी रंगाचे ‘जरा जपून’ तर घरामध्ये शौचालय नाही. त्या घरातील सर्व सदस्यांना उघड्यावर शौचास जावे लागते अशांच्या घरांच्या दर्शनी भागात लाल रंगाचे धोका दर्शविणारे स्वच्छता कार्ड लावण्याचा शुभारंभ बल्लारपूर तालुक्यात करण्यात आला.