अन् प्रेमनगरातील ग्रामस्थांनी गावच सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:03 IST2017-12-19T00:02:55+5:302017-12-19T00:03:22+5:30
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील ग्रामस्थांवर आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे अखेर गावच सोडून देण्याची पाळी आली.

अन् प्रेमनगरातील ग्रामस्थांनी गावच सोडले
शंकर चव्हाण।
आॅनलाईन लोकमत
जिवती : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील ग्रामस्थांवर आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे अखेर गावच सोडून देण्याची पाळी आली. वाद विकोपाला जाऊन एखादी अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनीच यासाठी ग्रामस्थांचे समुपदेशन केले. त्याला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी हा निर्णय घेत सोमवारी आपले बस्तान सेवादासनगरात हलविले.
जिवतीपासून २७ कि.मी. अंतरावर असलेल्या नोकेवाडा ग्रा.पं. मधील प्रेमनगरातील नागरिक उदरनिर्वाहासाठी सेवादासनगरातून स्थलांतरित झाले होते. दहा वर्षांपूर्वी प्रेमनगरात येऊन त्यांनी आपली वस्ती थाटली होती. गाव महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असल्याने नोकेवाडा ग्रामपंचायतींतर्गत प्रेमनगरात सिमेंट रस्ता व पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. आणि आता गावात विजेचे खांबही आले होते. दरम्यान, तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून बंजारा व आदिवासी समाजात वाद पेटला आहे. विशेष म्हणजे, प्रेमनगर गावाची महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा राज्यातही नोंद झाली आहे. ग्रामस्थांची नावेसुद्धा तेलंगणातील मतदान यादीत समाविष्ट झाली आहे. हीच बाब तेलंगणा राज्यातील कोलामा येथील नागरिकांच्या मनात खटकत होती. आता प्रेमनगरातील ग्रामस्थसुद्धा आपल्या आरक्षणाचा फायदा घेत सुविधा घेतील, असा समज झाल्याने तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरात हल्ला चढविला. गाव उठवा नाहीतर घरे जाळू व जिवानिशी मारू, अशा धमक्या दिल्या. याबाबत प्रेमनगरातील ग्रामस्थांनी पोलिसात तक्रार करून संरक्षक मागितले. निवेदन दिल्यानंतर पुन्हा तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरात येऊन गोंधळ घातला. सोमवारपर्यंत गाव न हटविल्यास घरे जाळून टाकू, असा इशारा देत लोकांनी प्रेमनगरातील एका मांडवाला आग लावली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस विभागाने प्रेमनगरात दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त कुमक पाठवून तगडा बंदोबस्त लावला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तेलंगणातील लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा रोष वाढतच असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी प्रेमनगरातील ग्रामस्थांचेच समुपदेशन करीत त्यांना सेवादासनगरात हलविले.