बाळापूरच्या ग्रामसेविकेला मागविला खुलासा
By Admin | Updated: May 2, 2015 01:14 IST2015-05-02T01:14:52+5:302015-05-02T01:14:52+5:30
निकष डावलून खर्च केल्याच्या आरोपावरुन बाळापूर (बुज.) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला जिल्हा परिषदेच्या वतीने खुलासा मागविण्यात आला आहे.

बाळापूरच्या ग्रामसेविकेला मागविला खुलासा
नागभीड : निकष डावलून खर्च केल्याच्या आरोपावरुन बाळापूर (बुज.) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला जिल्हा परिषदेच्या वतीने खुलासा मागविण्यात आला आहे. या नोटीसमुळे पंचायत विभागात खळबळ उडाली आहे.
पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेचा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त होतो. तो निधी कुठे आणि कसा खर्च करायचा, याचे काही निकष शासनाने ठरवून दिले आहेत. परंतु बाळापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका शुभांगी कावडकर यांनी हा निधी खर्च करताना शासनाने ठरवून दिलेले निकष लक्षात न घेता हा निधी खर्च केल्याचे निदर्शनास आले. यामुळे पर्यावरणाचा कोणताही उद्देश सफल होत नसून या खर्चासाठी सरपंच-सचिवास दोषी धरण्यात आले.या मुद्द्यावर १ लाख ३९ हजार २३७ रुपये खर्च करण्यात आले असून ही रक्कम वसुलपात्र आहे, असे नोटीसात म्हटले आहे.
नियमबाह्य मासिक सभा
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या नियम (४) अन्वये मासिक सभेचे नोटीस सभा ठरविलेल्या तारखेच्या निदान तीन दिवस अगोदर व सभेची तारीख वेळ आणि ठिकाण, चालवायचे कामकाज यासंबंधीची माहिती सर्व सदस्यांना पाठवायला पाहिजे, असा नियम असताना बाळापूर ग्रामपंचायतीने २८ आॅक्टोबर २०१४ च्या मासिक सभेचे नोटीस २५ आॅक्टोंबर २०१४ रोजी काढले. हा कालावधी तीन ऐवजी दोन दिवसाचा होत असल्याने ही सभाच नियमबाह्य ठरविण्यात आली असून सभेत घेण्यात आलेले ठराव सुद्धा अवैध ठरविण्यात आले आहेत. यामुळे या सभेत ठराव घेवून खरेदी करण्यात आलेले बैठक ओटे खरेदीचा खर्च अवैध ठरविण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर सचिवाने बनावटीने दस्ताऐवज तयार करुन व ठराव लिहून घेतल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे.
याशिवाय निविदा नियमानुसार न करणे, मुल्यांकणापेक्षा जास्त खर्च करणे, एकाच तारखेत दुबार-तिबार मंजूरी देवून अफरातफर करणे, एकाच बिलाचे तुकडे करुन रकमेचा अपहार करणे, आदी मुद्द्यावर सुद्धा खुलासा मागविण्यात आला आहे. या मुद्द्यांवरुन प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले असून ग्रामसेविका नोटीसाला काय उत्तर देतात याकडेही लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)