वाघाच्या दर्शनाने गावकरी भयभीत
By Admin | Updated: February 23, 2015 01:18 IST2015-02-23T01:18:49+5:302015-02-23T01:18:49+5:30
कोठारी वनपरिक्षेत्रातील कोठारी बिटात काटवली शिवारावर मनोहर बोरुले या शेतकऱ्याला शेतीची जागल करताना १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री वाघाने हल्ला करून ठार मारले.

वाघाच्या दर्शनाने गावकरी भयभीत
कोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रातील कोठारी बिटात काटवली शिवारावर मनोहर बोरुले या शेतकऱ्याला शेतीची जागल करताना १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री वाघाने हल्ला करून ठार मारले. यामुळे ७० कुटुंबाच्या ३०० लोकात भयंकर भीती संचारली. पुन्हा १९ फेब्रुवारीच्या रात्री घटनास्थळाच्या शेजारील शेतात वाघ काही महिलांना दिसल्याने गावकऱ्यांसह शेतकरी भयभीत झाले आहेत. आता शेतकऱ्यांनी शेतीची जागल करणेही सोडून दिले आहे.
मागील दोन ते तीन महिन्यापासून या भागात वाघ, बिबट, आदी हिस्त्र प्राण्यांनी हैदोस घातला होता. यात बैल, गाय, शेळ्या व कुत्र्यांना जंगली प्राण्यांनी शिकार केली. रानटी डुकरांनी व सांबर, चितळांनी उभ्या पिकाची नासाडी केली आहे.
याबाबत वनविभागाला वेळोवेळी सूचना करुन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मात्र गावात फटाके फोडणे व गस्त करण्यापलिकडे कुठलीही ठोस उपाययोजना वनविभागाने केली नाही. परिणामी जागल करणाऱ्या शेतकऱ्यास जिवानीशी मुकावे लागले. घरचा कर्ता पुरुष हिराविल्याने बोरुले कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या मयुरी नामक मुलीचे नुकतेच लग्न जुळले असून मुलीचे लग्न कसे करायचे, हा प्रश्न मृत मनोहरची पत्नी सुनितासमोर उभा ठाकला आहे. आता शेतीचे कितीही नुकसान होवो, मात्र जीव वाचला पाहिजे, अशा प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत. (वार्ताहर)
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
शेतकऱ्यांना शेतीची राखण करण्यासाठी शेतात मचानी उभाराव्या लागतात. मात्र लाकडी मचानी उभारण्यासाठी जंगलातील लाकूड आणण्यास वनविभागाने मज्जाव केल्याने जमिनीवर झोपडी करुन शेतीची राखण करावी लागत आहे. शेतकऱ्यांना शासनाने लोखंडी मचानी पुरवाव्या व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जि.प. सदस्य चंद्रकांत गुरु, राजू बुद्धलवार, मोरेश्वर लोहे, शैलेश रामटेके, सरपंच माधुुरी ढुमणे यांनी केली आहे.
घटनास्थळावर वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी तीन कॅमेरे लावण्यात आले असून रात्री कॅमेरात वाघ आला नाही. मात्र गावकरी वाघ दिसल्याचे सांगत असल्याने पुन्हा कर्मचाऱ्यांची गस्त वाढवून कॅमेरे विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत. वाघाला पकडण्यासाठी वरिष्ठाकडे मंजुरी मागितली आहे. ती मिळताच पिंजरे लावून वाघाला पकडण्यात येईल.
- संजय भंडारी,
वनाधिकारी, कोठारी.