वेकोलिच्या जडवाहतुकीविरोधात गावकऱ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: March 19, 2017 00:33 IST2017-03-19T00:33:48+5:302017-03-19T00:33:48+5:30
पैनगंगा वेकोलि प्रकल्पांतर्गत येत असलेल्या गाडेगाव (वि) येथील नागरिकांनी वेकोलिच्या जड वाहतुकीविरोधात बेमुदत आंदोलन पुकारले आहे.

वेकोलिच्या जडवाहतुकीविरोधात गावकऱ्यांचे आंदोलन
आरोग्य धोक्यात : गावामधून होते वेकोलिची वाहतूक
आवारपूर : पैनगंगा वेकोलि प्रकल्पांतर्गत येत असलेल्या गाडेगाव (वि) येथील नागरिकांनी वेकोलिच्या जड वाहतुकीविरोधात बेमुदत आंदोलन पुकारले आहे.
वेकोलिने गाडेगाव या गावाला दत्तक घेतले आहे. मुख्य खदानीमध्ये जाण्यासाठी गावातील रस्त्याचा अवलंब कराव लागतो. त्यामुळे या मार्गाने गावामधून रोज शेकडो जड वाहनांची रेलचेल असते. यामुळे या गावातील लोकाना जडवाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो. याशिवाय रस्त्याचेही तीनतेरा वाजतात. इतर त्रास वेगळाच. त्यामुळे गावकरी कंटाळलेले आहे. गावाच्या मध्यभागातून वाहतूक होत असल्याने प्रत्येकाच्या घरात धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. गावातील प्रत्येक नागरिक हा आज कोणत्या न कोणत्या आजाराने ग्रस्त झाला आहे. एवढेच नाही तर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असल्याने शेजारील मौजा विरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जाण्यास तारेवरची कसरत करावी लागत असून नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहे. खदानीच्या ब्लास्टिंगमुळे घरांना धोका निर्माण झाला असून घरातील भांडे रोजच पडतात. ध्वनी प्रदूषणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे पीक धुळीमुळे काळे झाले आहे. (वार्ताहर)
आजपर्यंत अनेकदा आम्ही वेकोलि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र त्यांनी थोडीही आत्मीयता दाखवलेली नाही. रस्तावर येण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. जोपर्यंत वेकोलि आपला पर्यायी रस्ता तयार करून देणार नाही, तोपर्यंत वेकोलिच्या जड वाहतूक गावामधून जाऊ देणार नाही
- शारदा दौलत झाडे,
सरपंच, गाडेगाव.