कोअर झोनमधून होणार गावाचे स्थलांतर
By Admin | Updated: October 24, 2016 00:57 IST2016-10-24T00:57:20+5:302016-10-24T00:57:20+5:30
जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील दोन गावे आधीच स्थलांतरित करण्यात आली आहेत.

कोअर झोनमधून होणार गावाचे स्थलांतर
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : गावाच्या पुनर्वसनाला केंद्र सरकारची मान्यता
मिलिंद कीर्ती चंद्रपूर
जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील दोन गावे आधीच स्थलांतरित करण्यात आली आहेत. आता पळसगाव (सिंगरू)च्या स्थलांतराला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्याकरिता ३०० एकरचे जंगल साफ केले जाणार आहे.
पळसगाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये असले तरी सध्या त्या गावापर्यंत एस. टी. बस जात असते. पाच गावांपैकी जामनी व रामदेगी (नवेगाव) ही दोन गावे चिमूर तालुक्यातील खडसंगीजवळ आमडी येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. जिल्हा पुनर्वसन विभागातर्फे जामनीच्या २२२ कुटुंबांपैकी २०१ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. रामदेगी (नवेगाव)च्या २४० कुटुंबांपैकी २३९ कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे.
बोटेझरीचे ६९ कुटुंब भगवानपूर येथे स्थलांतरित झाली आहेत. कोळसा या गावच्या बहुसंख्य लोकांचा विरोध स्थलांतराला विरोध आहे. कोळसा येथील २२१ पैकी पहिल्या टप्प्यात ४९ कुटुंब भगवानपूरला स्थलांतरित झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ६७ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. उर्वरित कुटुंबांनी गाव सोडण्याबाबत निर्णय घेतलेला नाही.
मात्र, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांच्यानुसार, गावकऱ्यांनी आता स्थलांतराचा निर्णय घेतला पाहिजे. वर्धा जिल्ह्यातील बोर प्रकल्पाच्या जंगलाचा प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला. त्याप्रमाणे ताडोबासाठीही प्रस्ताव मंजूर करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बोटेझरीचे स्थलांतर केल्यावर या गावकऱ्यांचे पुनर्वसन व्यवस्थित करण्यात आले नसल्याची ओरड सुरू आहे. त्यामुळे कोळसा येथील नागरिकदेखील अडून बसले आहेत. पळसगावनंतर रानतळोधीच्या स्थलांतराचाही प्रश्न शिल्लक आहे. मात्र, शासनाने सुविधा बंद केल्यावर कोळसा येथील गावकऱ्यांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून ताडोबाच्या कोअर झोनमधील गावांचे स्थलांतर रखडलेले होते. आता पळसगावला केंद्राने मान्यता दिली असल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
अटी व शर्र्तींवर स्थलांतर
पळसगाव (सिंगरू)चे स्थलांतर करण्यास केंद्र सरकारने काही अटी व शर्ती घालून ९ सप्टेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पळसगावसाठी वरोरा तालुक्यातील पेव्हारा कंपार्टमेंटमधील सालोरी बीट येथील ३०० एकर जंगल तोडण्यात येणार आहे. पळसगावमध्ये १९० कुटुंब राहतात. ते स्थलांतरित झाल्यावर एस.टी.बस बंद करण्यात येणार आहे.