ग्रामसभाच गावाची संसद - अण्णा हजारे
By Admin | Updated: December 2, 2014 23:03 IST2014-12-02T23:03:07+5:302014-12-02T23:03:07+5:30
शब्दाने ज्ञान सांगून प्रभाव पडत नाही. त्यासाठी आधी कृती केली पाहिजे. आपण जर तुकडोजी महाराज, तुकाराम दादा, महात्मा गांधी यांचे विचार अंगिकारण्याची प्रतिज्ञा केली तर येत्या पाच वर्षांत

ग्रामसभाच गावाची संसद - अण्णा हजारे
ब्रह्मपुरी : शब्दाने ज्ञान सांगून प्रभाव पडत नाही. त्यासाठी आधी कृती केली पाहिजे. आपण जर तुकडोजी महाराज, तुकाराम दादा, महात्मा गांधी यांचे विचार अंगिकारण्याची प्रतिज्ञा केली तर येत्या पाच वर्षांत विदर्भ बदलून जाईल. शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन अंगिकारायचे असेल तर वाईट गोष्टींचा त्याग करावा लागेल. देश बदलविण्यापूर्वी पहिल्यांदा गावापासून सुरूवात करावी लागेल. डोनेशन किंवा अनुदान देऊन देश बदलता येणार नाही. त्यासाठी उत्तम कार्यकर्ता बनून पुढाकार घ्यावा लागेल. लोकसभा, विधानसभेपेक्षाही ग्रामसभा ही सर्वोच्च आहे. त्यामुळे ग्रामसभा हिच गावाची संसद होय, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. ते कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य जन्मशताब्दी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते.
अड्याळ (टेकडी) येथे तीन दिवसीय जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता मंगळवारी झाली. या कार्यक्रमासाठी ेसमाजसेवक अण्णा हजारे, सिंधूताई सपकाळ, ुलक्ष्मणदादा नारखेडे, उमेश चौबे, देवाजी तोफा, सत्यपाल महाराज, भाऊसाहेब थुटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भजनाने, श्रमदान करून झाली. दुपारच्या सत्रात समारोपीय कार्यक्रमात सिंधूताई सपकाळ यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, बापाची गरीबी झाकायसाठी मुलीचा जन्म व्हावा, देशाची इज्जत राखण्यासाठी आईचा जन्म व्हावा. दादांनी दिलेला वसा सतत जिवंत ठेवा, असे त्यांनी सांगितले. महिलांना घराबाहेर काढा. त्यांना सक्षम बनवा, असे वेळोवेळी सांगितल्यामुळे महिलांना चांगले दिवस आले आहेत. आत्महत्या शेतकरी करतो. परंतु तो माणुससच असतो. महिला आत्महत्या करीत नाही. कारण ती आई असते, असेही सिंधूताईंनी सांगितले. सत्यपाल महाराजांनी आपल्या भाषणातून बुवाबाजीवर प्रहार केला.
देवाजी तोफा, लक्ष्मणदादा नारखेडे यांनीही या समारोपीय कार्यक्रमात विचार मांडले. या कार्यक्रमाला हजारो गुरूदेवभक्त उपस्थित होते.
प्रास्ताविक कुंभारे यांनी तर, संचालन रविदादा खळतकर यांनी केले. तीन दिवस चाललेल्या महोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी परिसरातील बहुसंख्य गुरुदेव भक्त उपस्थित होते.(प्रतिनिधी)