नितेशच्या निधनाने गाव हळहळले
By Admin | Updated: November 13, 2015 01:04 IST2015-11-13T01:04:13+5:302015-11-13T01:04:13+5:30
तालुक्यातील तीन किमी अंतरावर असलेल्या देवाडा (खुर्द) येथील नितेश सातपुते याचा नदीत बुडून मृत्यू झाला.

नितेशच्या निधनाने गाव हळहळले
पोंभूर्णा : तालुक्यातील तीन किमी अंतरावर असलेल्या देवाडा (खुर्द) येथील नितेश सातपुते याचा नदीत बुडून मृत्यू झाला. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच नितेशला बघाण्यासाठी त्याच्या घरासमोर गावातील लोकांची चिक्कार गर्दी झाली. त्याचे आई- वडील नितेशच्या आठवणीने हंबरडा फोडीत होते. हे पाहून उपस्थितानाही गहिवरून आले. दिवाळी सणाच्या उत्साही वातावरणात गावात शोककळा पसरली. आणि नितेशच्या मृत्यूने सारा गाव दुखाच्या छायेत बुडाला.
कुणाच्याही डोळ्यातील अश्रू थांबता- थांबत नव्हते. नातलग त्यांच्या परीने नितेशच्या आई-वडिलांची समजूत घालित असली तरे घराचे चैतन्य असलेला नितेश आता कधीच परतणार नाही, या जाणिवेने त्यांचा आक्रोश साऱ्यांचेच हृदय हेलावून सोडणारा होता. देवाडा खुर्द येथील रहिवासी गणपती सातपुते याला नितेश (१६) व संदेश (१३) ही दोन गोंडस मुले होती. त्यातील नितेश राष्ट्रमाता विद्यालय देवाडा (खुर्द) येथे इयत्ता १० वीमध्ये तर संदेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत होता. दिवाळीच्या सुट्या लागल्याने शेतावर काम करण्यासाठी नितेश मंगळवारी आई- वडिलांसोबत गेला. दमलेल्या आई- वडिलाला नितेशने कामात मदत सुद्धा केली. काही वेळानंतर घरुन पिण्यासाठी आणलेले पाणी संपल्याने त्यास जवळच असलेल्या अंधारी नदीच्या पात्रातून पाणी आणण्यासाठी सांगितले. तो अंधारी नदीच्या पात्रात पाणी काढण्यासाठी गेला असता बुडून मरण पावला. (तालुका प्रतिनिधी)