पथदिव्यांअभावी गाव अंधारात
By Admin | Updated: December 30, 2015 01:46 IST2015-12-30T01:46:18+5:302015-12-30T01:46:18+5:30
स्थानिक नगरपंचायत निवडणुक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसतसा त्या-त्या प्रभागातील उमेदवाराने मतदारांशी आपला संपर्क वाढविला आहे.

पथदिव्यांअभावी गाव अंधारात
अस्वच्छतेने बेजार : नागरिकांना विकासाची अपेक्षा
संघरक्षित तावाडे जिवती
स्थानिक नगरपंचायत निवडणुक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसतसा त्या-त्या प्रभागातील उमेदवाराने मतदारांशी आपला संपर्क वाढविला आहे. मात्र भेटण्यासाठी आलेल्या उमेदवारांना प्रभागातील समस्यांबाबत नागरिक अवगत करीत असल्याचे चित्र येथे पहायला मिळत आहे.
जिवती नगरपंचायत होण्याअगोदर सहा किलोमीटर अंतरावरील सारंगपूर हे गावसुद्धा जिवती गट ग्रामपंचायतीअंतर्गत येत होते. आता हे गाव नगरपंचायतीला जोडण्यात आले आहे. येथे प्रभाग क्रमांक पाच व सहा असे दोन प्रभाग पडले आहेत. असे असले तरी हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या गावात जाण्यासाठी रस्ता असूनही तो नसल्यासारखाच आहे. या रस्त्यावरील गिट्टी ठिकठिकाणी उखडली आहे. सोबतच या गावात पाण्याची टंचाई असून गावात विजेचे खांब नाहीत. वस्तीतील रस्त्यांची कामे एक वर्षांपूर्वी करण्यात आली. परंतु आता संपूर्ण रस्ते उखडून गेले आहेत. पाण्याची समस्या सुटावी या हेतूने जलस्वराज्य योजनेतून विहीर बांधण्यात आली. पण कालांतराने ही योजनाच बंद पडली. प्रभाग सातमध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छताच असल्याचे चित्र बघायला मिळते. येथे खांब तर आहेत, पण त्यावर पथदिवे नाहीत. आजपर्यंत ज्या समस्यांशी सामना केला, त्याचा या निवडणुकीनंतर तरी निपटारा व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. निवडून येणारा उमेदवार विकास कामे करणारा असावा, असी येथील मतदारांची अपेक्षा आहे. सारंगपूर येथे प्रभाग पाच व प्रभाग सहा असून या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा पक्षाचा प्रत्येकी एक-एक उमेदवार उभा आहे. काँग्रेसने मात्र या ठिकाणी आपला उमेदवार उभा केला नाही. प्रभाग पाच सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असून भाजपाचे रामराव चव्हाण तर राष्ट्रवादीचे केशव चव्हाण असे दोनच उमेदवार येथे उभे आहेत. प्रभाग सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असून भाजपाकडून अनुसया राठोड तर राष्ट्रवादीकडून शेवंताबाई राठोड असे दोनच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रभाग सातमध्ये सर्वसाधारण महिला राखीव आहे. काँग्रेसकडून हेमलता तिडके, भाजपाच्या श्रद्धा वडेट्टीवार, राष्ट्रवादीकडून कविता झाडे तर बहुजन समाजपार्टीकडून चैत्राबाई गायकवड रिंगणात आहेत. या तिनही प्रभागातील उभ्या असणाऱ्या समस्या पाहता मतदारांचा कौल कुणाकडे जाणार, हा प्रश्न आहे.