गडचांदूरच्या नगराध्यक्षपदी विजयालक्ष्मी डोहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:00 IST2017-08-19T23:59:53+5:302017-08-20T00:00:30+5:30
गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी राकाँच्या विजयालक्ष्मी अरुण डोहे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या आनंदी मोरे विजयी ठरल्या.

गडचांदूरच्या नगराध्यक्षपदी विजयालक्ष्मी डोहे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी राकाँच्या विजयालक्ष्मी अरुण डोहे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या आनंदी मोरे विजयी ठरल्या.
विजयालक्ष्मी डोहे यांनी काँग्रेसच्या रेखा बंडू धोटे यांचा ८ मतांनी पराभव केला. विजयालक्ष्मी डोहे यांना ११ तर रेखा धोटे यांना ३ मते पडली. तर आनंदी मोरे यांनी काँग्रेसचे पापय्या पोन्नमवार यांचा ६ मतांनी पराभव केला. आनंदी मोरे यांना १० तर पापय्या पोन्नमवार यांना ४ मते पडली. १७ सदस्यसंख्या असलेल्या गडचांदूर नगर परिषदेमध्ये सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे त्यांनी भाजप-शिवसेनेच्या मदतीने सत्ता काबीज केली. भाजपला उपाध्यक्षपद मिळाले तर शिवसेनेला बांधकाम सभापती पद मिळणार असल्याचे कळते.
आजच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे नगरसेवक सागर ठाकूरवार व अरुणा बेतावार तसेच शिवसेनेच्या चंद्रभागा कोरवते अनुपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजानिधी यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी संजय जाधव, प्रकाश हिबारे, मेघा माने, संतोष करदोडे यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे गुलाल उधळून स्वागत करण्यात आले व विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये माजी आमदार सुदर्शन निमकर, सतीश धोटे, राकाँचे गटनेते निलेश ताजने, सतीश उपलेंचवार, अरुण डोहे, सचिन भोयर, रोहन काकडे तथा राकाँ, भाजप, शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होते.