शहीद पोलिसांचे वारसदार लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 00:41 IST2017-03-13T00:41:29+5:302017-03-13T00:41:29+5:30
नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसाची पत्नी असल्याचे सांगून मिळणाऱ्या शासकीय सवलतीचा लाभ संबंध ...

शहीद पोलिसांचे वारसदार लाभापासून वंचित
निवेदन दिले : पोलीस महासंचालकांसमोर मांडल्या व्यथा
मूल : नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसाची पत्नी असल्याचे सांगून मिळणाऱ्या शासकीय सवलतीचा लाभ संबंध नसलेली व्यक्ती घेत असून खरे लाभार्थी मात्र त्या सवलतींपासून वंचित राहत आहेत, यासंदर्भात तक्रार करुनही पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने सदर प्रकरणात न्याय मिळावा, अशी विनंती शहिदाचे बंधू तुकाराम सूरकर यांनी विशेष पोलीस महासंचालक यांना केली आहे.
सावली तालुक्यातील कवठी येथील सुरेश सोमाजी सूरकर हे गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन पोलीस पदावर कार्यरत होते. ३१ जुलै १९९२ रोजी लाहेरी येथील पोलीस चौकीवर झालेल्या नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युतर देताना सुरेश सोमाजी सूरकार यांच्यासह काही पोलीस कर्मचारी शहीद झाले. शेती करुन उदरनिर्वाह भागविणाऱ्या कुटुंबाचा आधार असलेल्या सुरेशच्या शहीद होण्याने सुरकार कुटुंबाचा आधार मोडला. नक्षलवादी हल्ल्यात शहीद होण्याच्या सहा महिन्यापूर्वी सुरेशचे लग्न झाले होते. त्यामुळे स्व. सुरेशच्या पत्नीलाही मोठा आघात पोहोचला. दरम्यान सुरेशच्या मृत्यू पश्चात काही दिवसानंतर त्यांच्या मंगला नामक पत्नीने गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला येथील रोहणकर नामक व्यक्तीसोबत पूर्नविवाह केला. सद्यस्थितीत मंगला हिला दुसऱ्या पतीपासून दोन अपत्य असून कौटुंबिक परिस्थितीतीही उत्तम आहे. सुरेशच्या शहीद झाल्यानंतर मंगला नामक त्याच्या पत्नीने रोहणकर नामक व्यक्तीसोबत पुर्नविवाह करुन त्याच्या दोन अपत्याची आई असल्याने सद्यस्थितीत तिचा सुरकर कुटुंबाशी प्रत्यक्ष कोणताही संबंध नाही. असे असताना मंगला रोहणकर या अजूनही शहीद सुरेश सुरकर यांची पत्नी असल्याचे दाखवून शहीद पोलिसांना मिळणाऱ्या शासकीय योजना आणि सवलतींचा लाभ घेत आहे. ही बाब गैर असून पोलीस प्रशासनाची फसवणूक करणारी असल्याने यासंदर्भात अनेकदा गडचिरोली पोलिसांशी पत्रव्यवहार केला.
परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान शहीदांच्या वारसदारास शासनाकडून सदनिका ऐवजी रोख रक्कम दिल्या जाणार असल्याची माहिती देणारे गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पत्र शहीद सुरेशचे मोठे बंधू तुकाराम सुरकर यांना २ डिसेंबर २०१६ रोजी मिळाले. त्यानुसार तुकाराम सुरकर यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेवून वास्तविकता लेखी व तोंडी ऐकविली. परंतु अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे शहीद सुरेशचे मोठे बंधू तुकाराम सुरकर यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्री यांच्यासोबतच संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना कळविली आहे. दरम्यान नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक प्रतापसिंग पाटणकर हे शासकीय कामानिमित्त मूल येथे आले असताना तुकाराम सूरकर यांनी पोलीस स्टेशन मूल येथे प्रत्यक्ष भेटून खरे वारसदार म्हणून न्याय देण्याची विनंती केली.
यावेळी विशेष पोलीस महासंचालक पाटणकर यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करुन न्याय दिल्या जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्यासह तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)