काळ्या आईची ओटी भरण्यास बळीराजा आतूर
By Admin | Updated: June 27, 2016 01:14 IST2016-06-27T01:14:42+5:302016-06-27T01:14:42+5:30
चिमूर तालुक्यासह जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दररोज पावसाची फक्त वातावरण

काळ्या आईची ओटी भरण्यास बळीराजा आतूर
चिमूर : चिमूर तालुक्यासह जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दररोज पावसाची फक्त वातावरण निर्मिती होत असून शेतकरी वर्गासह सर्व समान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रत्येक जण आभाळाकडे नजरा लावून असून ये रे, ये रे, पावसा... अशी आर्त हाक सुरू आहे. पावसाअभावी बळीराजा सर्व सोपस्कार उरकवून, काळ्या आईची ओटी भरण्यासाठी आतूर झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
चिमूर तालुक्यात काही भागात तुरळक पाऊस झाला. या तुरळक एका दिवसाच्या पावसाने व रोज होणाऱ्या वातावरणाने काही भागातील शेतकऱ्यांनी कपासीची व सोयाबीनची पेरणी केली. मात्र पुरेसा पाणी न आल्याने बीज उगवलेच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. तर अनेक गावात पाऊस न आल्याने पाऊस कधी येणार, अशीच चर्चा व वरुणराजाला साकडे घालने सुरू झाले आहे.
पूर्व मौसमी पावसाचा कालावधी उलटूनही वरुणराजाने अद्याप हजेरी लावली नाही. मान्सून पुढे गेल्याच्या बातम्या झळकत असल्यामुळे जगायचे कसे, जनावरे जगवायची कशी, कर्ज फेडायचे कसे, आदी प्रश्न सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांसमोर आवासून उभा राहिला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना आनंदाचा पारावार नव्हता. मात्र वरुणराजा शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. आकाशात ढग जमा होत असले तरी पाऊस पडत नसल्याने अजून किती दिवस परीक्षा पाहणार, असे अनेक जण बोलून दाखवताना दिसतात.
आणखी काही दिवस पाऊस लांबणीवर पडल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बळीराजा आता तरी बरस अशी आर्त हाक सुरू असून काही गावात पूजा, होमहवन, घंटानाद सुरू आहे. रविवारी सायंकाळी आभाळ झाला. मात्र पाऊस पडला नाही. (प्रतिनिधी)
चिमूर तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी अजूनही तिफण हातात घेतली नाही. पावसाच्या गैरहजेरीने बळीराजा चांगलाच भांबावून गेला आहे. गतवर्षी चिमूर परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना काळ्या आईची ओटी वेळेवर भरली व काही प्रमाणात कापूस व धान्याचे उत्पादन घेतले होते. मात्र यावर्षी वरुणराजा बरसेल व चांगल्या दमाचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी दिवस मोजत आहे.
जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न
मागच्या वर्षीच्या उत्पादनातून जनावरासाठी साठवून ठेवलेला बैलाचा चार आता संपण्यागत आला आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडून हिरवा चारा येईल, या आशेवर शेतकरी होते. मात्र आता चाऱ्याचा प्रश्न आहे.
पेरण्या खोळंबल्या
४चिमूर तालुक्यात खडसंगी, आमडी, बोथली, भिसी, शंकरपूर, जांभुळघाट, नेरी, मोरेगाव परिसरात पाऊस न झाल्याने धानाच्या पऱ्यासह कापसाच्या व सोयाबीनच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करून ठेवली आहे. पाऊस न पडल्यास हजारो रुपये खर्चून खरेदी केलेले बियाणे निकामी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.