कोरपना येथील पशुवैद्यकीय दवाखाना सलाईनवर
By Admin | Updated: October 1, 2014 23:21 IST2014-10-01T23:21:05+5:302014-10-01T23:21:05+5:30
आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुकास्तरावरील पशुवैद्यकीय दवाखाना सध्या सलाईनवर असून विविध समस्यांनी ग्रासला गेला आहे. येथील पशुधन विकास

कोरपना येथील पशुवैद्यकीय दवाखाना सलाईनवर
वनसडी : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुकास्तरावरील पशुवैद्यकीय दवाखाना सध्या सलाईनवर असून विविध समस्यांनी ग्रासला गेला आहे. येथील पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद १० वर्षांपासून रिक्त आहे.
तालुक्यात सद्यस्थितीत कोरपना, गडचांदूर, वडगाव या तीन गावांसाठी श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र सर्वांत बिकट अवस्था कोरपना दवाखान्याची आहेत. या ठिकाणी १० वर्षांपासून पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने प्रभारी पशु पर्यवेक्षकाच्या भरोशावर दवाखान्याची धुरा आहे. येथील पशुपर्यवेक्षकाची नियुक्ती पिपर्डा येथील दवाखान्यात आहे. त्यांना या ठिकाणचा अतिरिक्त कारभार सोपविला गेला असल्याने दोन्ही दवाखान्याचा डोलारा त्यांना सांभाळावा लागत आहे. येथील दवाखान्याची इमारत अतिशय जीर्ण झाली असून पावसाळ्यात गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. तालुकास्तरावरील दवाखाना असून रॅबीजची लस येथे उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिकांना खासगी मेडीकल दुकानातून लस विकत घ्यावी लागते. त्यामुळे पशुपालकांना जादा पैसे मोजून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात झुडपे वाढली असून या परिसरात मोठ्या प्रमाणात हिस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जुना दवाखाना भग्नावस्थेत असून तो अनेक वर्षे लोटूनसुद्धा अद्याप जमिनदोस्त करण्यात न आल्याने मोकाट गुरांचे आश्रयस्थान बनला आहे. पशुवैद्यकीय विकास अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सदनिका दुर्लक्षितपणामुळे जीर्ण झाल्या आहेत. या सदनिकातील विद्युत पुरवठा अनेक वर्षांपासून खंडीत आहे. अशीच स्थिती नारंडा येथील दवाखान्याची झाली आहे. प्रभारी पशुपर्यवेक्षकांची नियुक्ती होण्यापूर्वी पाच वर्षे चपराशाच्या भरवशावर दवाखाना चालविला गेला. तालुकास्तरावरील दवाखान्याचे यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असू शकते, अशी खंत पशुपालकांकडून व्यक्त केली जाते. या ठिकाणी नविन पॉलीक्लिनीकची निर्मीती होणार असल्याची माहिती मात्र त्या दृष्टीने होणाऱ्या प्रशासकीय हालचाली संथगतीने आहे. त्यामुळे दवाखान्याचे भाग्य रामभरोसेच आहे.
येथील तीन रिक्त पदे तातडीने भरून व दवाखान्याची बिकट अवस्था त्वरित दूर करावी, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. (वार्ताहर)