कामतगुडा येथे आढळले अतिप्राचीन खडक; तेलंगणाच्या भूगर्भ वैज्ञानिकांकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2023 20:24 IST2023-04-15T20:24:06+5:302023-04-15T20:24:30+5:30
Chandrapur News कामतगुडा या गावापासून पूर्व दिशेला अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर अनेक वर्षांपूर्वी भूगर्भातील छिद्रातून वर आलेल्या लाव्हाचे खडकात रूपांतर झालेले खांब व शिला आढळून आल्या.

कामतगुडा येथे आढळले अतिप्राचीन खडक; तेलंगणाच्या भूगर्भ वैज्ञानिकांकडून तपासणी
दीपक साबणे
चंद्रपूर: भौगोलिकदृष्ट्या जिवती तालुक्याला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली (खुर्द) अंतर्गत कामतगुडा या गावापासून पूर्व दिशेला अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर अनेक वर्षांपूर्वी भूगर्भातील छिद्रातून वर आलेल्या लाव्हाचे खडकात रूपांतर झालेले खांब व शिला आढळून आल्या. विशेष म्हणजे, तेलंगणा राज्यातील भूगर्भ वैज्ञानिक येऊन या स्थळाला भेट देत येथील दगड तपासणीकरिता घेऊन जात आहेत. परंतु महाराष्ट्र शासन यापासून अनभिज्ञ आहे.
चिखली खुर्द ग्रामपंचायतींतर्गत कामतगुडा या क्षेत्रातील ६५० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या शिला आहेत. तसेच या क्षेत्रात बासाल्टचा दगड आढळून आलेला आहे, असा तेलंगणा राज्यातील भूगर्भ वैज्ञानिकांचा दावा आहे. हे कळताच हे क्षेत्र ऐतिहासिक असल्याचा स्थानिकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
तेलंगणा राज्याच्या आसिफाबाद जिल्ह्यातील केरामेरी मंडळाच्या वनक्षेत्रात लावा खडकांचे सापडलेल्या खांबाचा अभ्यास सुरू आहे. हे क्षेत्र महाराष्ट्र राज्यात असूनही तेलंगणा राज्य सरकार आपला ताबा करण्यासाठी एकही संधी सोडत नाही. वादग्रस्त १४ गावांत तेलंगणा सरकारची शासकीय यंत्रणा कार्यरत आहेच. परंतु महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात शासकीय यंत्रणा कार्यरत करण्यासाठी तेलंगणा सरकार पाय पसरत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र, महाराष्ट्र शासन मात्र मूग गिळून गप्प आहे.
जिवती तालुक्याला ऐतिहासिक वारसा
तालुक्याला ऐतिहासिक वारसा आहे. माणिकगड किल्ला, शंकरलोधी येथील गुफा व शिला, कामतगुडा येथे आता आढळून आलेल्या शिला, दगड आणि इतर वस्तू यावर पुरातत्व विभाग, भूगर्भ वैज्ञानिक व तज्ज्ञांनी संशोधन केल्यास चंद्रपूरचा प्राचीन इतिहास पुढे येऊ शकतो. परंतु याकडे अद्याप कुणाचेही लक्ष गेले नाही.
कामतगुडा येथे उपलब्ध असलेल्या शिला व बेसाल्टचा दगड हा ६५० दशलक्ष वर्षांपूर्वीचा असल्याचा तेलंगणा भूगर्भ वैज्ञानिकांचा दावा आहे. हे ठिकाण पूर्णपणे महाराष्ट्रात असून, शासनाने याची त्वरित दखल घ्यावी.
- वर्षाराणी सुनील जाधव, सरपंच, चिखली खुर्द.
जिवती परिसरात भूगर्भीय दगडात बेसाल्ट व शेल या प्रकारचे दगड आढळतात. याबाबत अभ्यास भूविज्ञान व खनिकर्म विभाग महाराष्ट्र शासन यांचा अभिलेखात नमूद असून, याचा अभ्यास सुद्धा पूर्ण झाला आहे. केंद्र शासनाचे भारतीय भू-सर्वेक्षण विभाग हैदराबाद (भारत सरकार) हे त्याचा नियमित सर्वेक्षण व नकाशीकरण अभ्यासांतर्गत क्षेत्रीय भेट व नमुना संकलन (दगडी नमुना) करीत असतात. तांत्रिक अभ्यासामध्ये राज्य वा जिल्ह्याची सीमा यासंदर्भात कोणत्याही मर्यादेचे बंधन नाही.
- सुरेश नैताम, उपसंचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, चंद्रपूर