सरकारी जमिनीसाठी बामणी येथे वीरूगिरी

By Admin | Updated: December 26, 2015 01:12 IST2015-12-26T01:12:25+5:302015-12-26T01:12:25+5:30

तालुक्यातील बामणी येथील राजस्व विभागाच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण हटविल्यानंतर ती जागा आपल्या नावे करण्याच्या मागणीसाठी ....

Veerugiri in Bamni for the government land | सरकारी जमिनीसाठी बामणी येथे वीरूगिरी

सरकारी जमिनीसाठी बामणी येथे वीरूगिरी

बल्लारपूर : तालुक्यातील बामणी येथील राजस्व विभागाच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण हटविल्यानंतर ती जागा आपल्या नावे करण्याच्या मागणीसाठी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर उदीसे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शुक्रवारी वीरूगिरी केली. उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या त्यांच्या धमकीमुळे प्रशासनाने साडे दहा तासानंतर रात्री ७ वाजता त्यांना खाली उतरविले.
ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर उदीसे यांनी गाव सीमेजवळ संस्थेच्या नावावर राजस्व विभागाच्या सव्वा एकर जागेवर अतिक्रमण केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी इतरही नागरिकांनी अतिक्रमण केले. याची तक्रार विद्यमान सरपंचानी तहसीलदार यांच्याकडे करून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली.
यावर कारवाई करताना तहसिलदारांनी दोन दिवसांपूर्वी सर्वाचे अतिक्रमण हटवून साहित्य जप्त केले. त्यामुळे उदीसे यांनी सरपंचावर आरोप करीत राजकीय द्वेषातून कारवाई केल्याचे म्हटले.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता गावातील पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी सरपंचाला अटक करावी व त्यांनी केलेल्या अतिक्रमीत जागेचा सातबारा देण्याची मागणी केली. त्यांना खाली उतरविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे, तहसीलदार दयानंद भोयर, ठाणेदार प्रदीप सिरस्कर हे टाकीखाली उपस्थित होते.
जप्त सामान, जमिनीचा पट्टा देण्यासाठी तहसील कार्यालयात थांबलेल्या फाईलीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर रात्री ७ वाजता उदीसे हे खाली उतरले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Veerugiri in Bamni for the government land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.