वेकोलि महिला कर्मचाऱ्याचा खून

By Admin | Updated: November 13, 2016 00:36 IST2016-11-13T00:36:11+5:302016-11-13T00:36:11+5:30

येथील खुली कोळसा खाण क्र. ३ च्या रेल्वे काटा घराजवळ कामावरून जेवनाच्या सुटीत घराकडे परत जात असताना ...

Veculi female employee's murder | वेकोलि महिला कर्मचाऱ्याचा खून

वेकोलि महिला कर्मचाऱ्याचा खून

श्वान पथकाला पाचारण : हत्येचे कारण अज्ञात
माजरी : येथील खुली कोळसा खाण क्र. ३ च्या रेल्वे काटा घराजवळ कामावरून जेवनाच्या सुटीत घराकडे परत जात असताना शनिवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास वेकोलिच्या एका महिला कर्मचाऱ्याची वजनी शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे. मृत महिलेचे नाव बातुनी अमीर अली (६०) आहे. ही महिला माजरीच्या सिद्धार्थ वॉर्ड क्र. ४ मधील रहिवासी आहे.
बातुनी अमीर अली शेख ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांची केवळ १८ दिवसांची सेवा शिल्लक होती. वृत्तलिहोस्तोवर त्यांची हत्या करणारे आरोपी पकडले गेले नव्हते. सदर महिलेच्या डोक्यावर वजनदार शस्त्राने तीन-चार वार करण्यात आले. त्यामुळे मेंदु बाहेर येऊन त्यांचा मृत्यू झाला.
माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार के. तिवारी यांनी आरोपीला पकडण्याकरिता चंद्रपूर येथून श्वान पथक बोलाविले होते. हा श्वान घटनास्थळापासून महिलेच्या घरापर्यंत पोहचला. परंतु तो आरोपी शोधू शकला नाही.
घटनेची माहिती मिळताच वरोराचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रताप पवार यांनी भेट दिली. या महिलेला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे घराचे काम सुरू असल्याने तो तेथे गेला आहे. माजरी पोलिसांनी तिच्या मुलीचे पती अस्लम यांचा मोबाईल तात्पुरता जमा केला आहे. बातुनी अमीर अली शेख यांच्या हत्येसंदर्भात पोलीस उपविभागीय अधिकारी प्रताप पवार व ठाणेदार के. तिवारी यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. (वार्ताहर)

Web Title: Veculi female employee's murder