वेकोलिमधून सुरू आहे लाखोंची भंगार चोरी
By Admin | Updated: October 11, 2015 02:17 IST2015-10-11T02:17:33+5:302015-10-11T02:17:33+5:30
वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात भंगार चोरी सुरू आहे.

वेकोलिमधून सुरू आहे लाखोंची भंगार चोरी
राजुरा : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात भंगार चोरी सुरू आहे. एमएच-३१ डी.एस. ४३१६ या मेटॅडोरमधून वेकोलिमधील साहित्य चोरून नेताना गाडीसह दोघांना अटक केली.
वेकोलिमधून मोठ्या प्रमाणात भंगाराची चोरी होत असून लाखोंचे साहित्य भंगारात विकले जात आहे. यापूर्वीसुद्धा वेकोलिच्या सुरक्षा गाडीमधूनच भंगार चोरून नेताना पोलिसांनी पकडले होते. सास्ती ओपन कास्टमधील नवीन सीएचपी तर गायबच झाली आहे. करोडो रुपये खर्च करण्यात आले. मधेच काम बंद पडले. या ठिकाणी मोठमोठी यंत्रसामग्री चोरट्यांनी भंगारात विकून टाकली आहे. वेकोलिला लाखो रुपयांचा फटका बसला तरीसुद्धा आजही राजरोसपणे वेकोलि क्षेत्रातून किमती साहित्याची चोरी होताना दिसत आहे.
यावर वेकोलि प्रशासनाचे कुठेच नियंत्रण दिसत नाही.
माल पकडला की पोलीस वेकोलिच्या अधिकाऱ्यांना बोलावून तक्रार घेतात. थातूर-मातूर चौकशी करतात. आठ दिवसात चोरटे सुटतात. पुन्हा आठ दिवसांनी गाडी सुटते आणि दहा वर्ष केस चालते. तोपर्यंत पुरावे बदलून जातात आणि आरोपी मोकळे होतात. यामुळेच चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचे अशा घटनांवरून वारंवार दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)