वेकोलित पुन्हा अनेक कोळसा खाणींचा प्रस्ताव
By Admin | Updated: November 3, 2015 00:28 IST2015-11-03T00:28:18+5:302015-11-03T00:28:18+5:30
कोल इंडिया लिमिटेड कंपनी अंतर्गत वेकोलीच्या व्हिजन २०२० पर्यंत नवीन व विस्तारित अशा एकूण ४२ कोळसा खाणी सुरू करण्यात येणार आहे.

वेकोलित पुन्हा अनेक कोळसा खाणींचा प्रस्ताव
कोळसा कामगारांत आनंद : मोठ्या प्रमाणात जमीन हस्तांतरण
माजरी : कोल इंडिया लिमिटेड कंपनी अंतर्गत वेकोलीच्या व्हिजन २०२० पर्यंत नवीन व विस्तारित अशा एकूण ४२ कोळसा खाणी सुरू करण्यात येणार आहे. यात विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक खाणी सुरू होणार आहेत. व्हिजन २०२० मध्ये ओपनकास्ट माईन्स ३१ व अंडरग्राऊंड माईन्स ११ नवीन कोळसा प्रकल्प प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. हे सर्व प्रकल्प सुरू झाल्यास वेकोलिला एक नवी दिशा मिळणार आहे.
या नवीन कोळसा ओपन कास्टमधून ६७.०५ मेट्रिक टन व अंडर ग्राऊंड कोळसा खाणीद्वारे १२.०५ मेट्रीक टन उत्पादन व्हिजन २०२० मध्ये करण्याचा संकल्प करण्यात येवून यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन हस्तांतरण करण्याचा प्रयत्न असेल. त्या दिशेने काही प्रस्तावही पूर्ण झाले असून पुढील कारवाईला वेग आला आहे.
या नवीन ४२ प्रोजेक्टपैकी याचवर्षी नागपूर जिल्ह्यात मकरधोकडा व धानेगाव आणि यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा ओपन कास्ट माईन्स सुरू करण्यात आल्या असून या तीनही खाणींचे काम सुरू झाले आहे. सन २०१५ च्या अखेरपर्यंत गोकूल ओनप कास्ट उमरेड क्षेत्र, यमुनीया अंडर ग्राऊंड पेंच क्षेत्र, शारदा अंडर ग्राऊंड कन्हान क्षेत्र, न्यू माजरी अंडर ग्राऊंडचे ओपन कास्ट माईन्समध्ये रूपांतर, दिनेश ओसीएम उमरेड क्षेत्र, वालु-नुथा अंडर ग्राऊंड कन्हान क्षेत्र, सिंगारी ओपन कास्ट नागपूर क्षेत्र, माजरी क्षेत्रांतर्गत एकोना फेस १ व फेस २ ओसीएम या कोळसा खाणी सुरु होणार आहेत. यानंतर पुढील वर्षी बल्लारपूर क्षेत्रात पवनी २ व ३, चिंचोली ओसीएम कामठी डीप ओसीएमसह काही सद्य:स्थितीत सुरू असणाऱ्या कोळसा खाणींचा विस्तार वाढविण्यात येणार आहे.
सन २०१८ पर्यंत वा नंतर भटाळी ओ.सी. माईन्सचा विस्तार चंद्रपूर क्षेत्र, कुंभारखनी अं.ग्रा.ला ओपन कास्ट माईन्स वणी नार्थ क्षेत्र, घुग्घुस ओ.सी.चे विस्तारीकरण, गौरी सेंट्रल ओसीएम बल्लारपूर क्षेत्र, माजरी क्षेत्रांतर्गत कोंढा व हारदुला १ व २ ओसीएम आणि नागपूर जिल्ह्यात सावनेर परिसरात नवीन कोळसा खदान सुरू करण्यात येणार आहे.
या नवीन प्रस्तावित कोळसा खाणी येत्या पाच वर्षात सुरू होणार असून वेकोलिचा व्हिजन २०२० कार्यक्रम आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या सर्व प्रकल्पासाठी ज्यांच्या शेतजमिनी हस्तांतरित होणार अशांना सुद्धा सहज रोजगार उपलब्ध होणार यात शंका नाही. (वार्ताहर)