निवडणूक लढविण्यावर बंदी तरी वेकोलि कर्मचाऱ्यांचे नामांकन
By Admin | Updated: July 29, 2015 00:46 IST2015-07-29T00:46:41+5:302015-07-29T00:46:41+5:30
४ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागात मोर्चेबांधणी सुरू आहे.

निवडणूक लढविण्यावर बंदी तरी वेकोलि कर्मचाऱ्यांचे नामांकन
नियमांची पायमल्ली : वेकोलि प्रशासनाचे मात्र कार्यवाही करण्यास दुर्लक्ष
वतन लोणे घोडपेठ
४ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागात मोर्चेबांधणी सुरू आहे. ताडाळी ग्रामपंचायतीमध्येही राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीसाठी अनेक वेकोलि कर्मचाऱ्यांनी नामांकन दाखल केले आहे. मात्र वेकोलिच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक लढविण्यास नागपूरच्या वेकोलि कार्यालयाने बंदी घातली असतानाही कर्मचाऱ्यांकडून या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे.
नागपूर वेकोलि कार्यालयाच्या पत्रानुसार वेकोलि कर्मचाऱ्याने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना नोकरीचा राजीनामा द्यावा, अशी अट आहे. तसेच निवडणूक जिंकल्यास वेकोलिच्या नोकरीवर संबंधीत कर्मचाऱ्याचा कुठल्याही प्रकारचा हक्क राहणार नाही, असेही नमुद आहे. मात्र या पत्राची सर्रास पायमल्ली होत आहे.
सध्या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी करून आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी व जवळच असलेल्या वेकोलितील नागरिकांचा ताडाळी ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो. वेकोलि येथील वणी व चंद्रपूर प्रभागातून पाच सदस्य तसेच ताडाळी गावामधून आठ सदस्य निवडून ग्रामपंचायतीला आवश्यक असणारी तेरा ही सदस्य संख्या पूर्ण करण्यात येते. या निवडणूक प्रक्रियेमध्ये वेकोलिचे कर्मचारीही उमेदवारी दाखल करतात. मात्र, यामध्ये वेकोलि प्रशासनाकडून निवडणूक लढविण्यास घालून दिलेल्या अटींचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
२ मे २००२ रोजी नागपूरच्या वेकोलि कार्यालयाकडून वेकोलि कर्मचाऱ्यांनी निवडणूक लढविण्यासाठी घातलेल्या अटींचे पत्र वेकोलिच्या सर्व कार्यालयांतील सामान्य प्रबंधक यांना पाठविण्यात आले होते. यानुसार, वेकोलि कर्मचाऱ्याने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोकरीचा राजीनामा द्यावा, अशी अट आहे. तसेच निवडणूक जिंकल्यास वेकोलिच्या नोकरीवर संबंधीत कर्मचाऱ्याचा कुठल्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. मात्र असे असताना देखील ताडाळी वेकोलिचे कर्मचारी सर्रासपणे निवडणूक लढवून ग्रामपंचायत सदस्य पदाचा उपभोग घेत आहेत. तसेच वेकोलि प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसल्याने, आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
ताडाळी ही तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत असल्याने तसेच एमआयडीसी परिसरातील कंपन्यांकडून दरवर्षी मिळणारी कराची रक्कम ही लाखोंच्या घरात असल्यामुळे या ठिकाणी गावातील नागरिकांप्रमाणेच वेकोली कर्मचारीही निवडणूक लढण्यास इच्छूक असतात.
एका कर्मचाऱ्याची ‘रौप्य महोत्सवी’
वर्षाकडे वाटचाल
वेकोलि येथील एक कर्मचारी मागील विस वर्षांपासून निवडणूक लढवत असून ग्रामपंचायत सदस्य पदाचा उपभोग घेत आहे. या निवडणुकीत देखील त्या कर्मचाऱ्याने उमेदवारी अर्ज दाखल करून ‘रौप्य महोत्सवी’ वर्षाकडे वाटचाल करण्याचा निश्चय केला आहे. मात्र वेकोलि प्रशासनाकडून यावर्षी तरी या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
अशा आहेत निवडणूक लढविण्याच्या अटी
संबंधित कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा द्यावा, निकाल लागल्यापासुन एक महिन्याच्या आत पुन्हा नोकरीसाठी प्रस्ताव पाठवावा, त्याला नोकरीवर घेतले जाईल मात्र तो निवडणुक हरल्यावरच, एखादा कर्मचारी निवडणुक जिंकल्यास त्याला परत नोकरीवर घेतले जाणार नाही, वेकोलिच्या माहितीशिवाय निवडणूक लढवत असेल अथवा निवड झालेल्या पदावर कायम राहत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.