वरोरा शहर काँग्रेस कमेटीचे उपोषण सुरूच

By Admin | Updated: May 15, 2016 00:36 IST2016-05-15T00:36:29+5:302016-05-15T00:36:29+5:30

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज जोडणीचा प्रश्न, बेरोजगारांना बँकांमार्फत न मिळणारे कर्ज, अनेक दिवसांपासून अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देण्याचे आश्वासन देऊन...

Varora City Congress Committee's fasting started | वरोरा शहर काँग्रेस कमेटीचे उपोषण सुरूच

वरोरा शहर काँग्रेस कमेटीचे उपोषण सुरूच

वरोरा : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज जोडणीचा प्रश्न, बेरोजगारांना बँकांमार्फत न मिळणारे कर्ज, अनेक दिवसांपासून अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देण्याचे आश्वासन देऊन न मिळालेले पट्टे आदी मागण्यांसाठी वरोरा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष शेख जैरूद्दिन यांच्या नेतृत्वात गुरूवारपासून तहसील कार्यालयसमोर साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन उपोषणकर्त्याशी चर्चा केली.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बँक व सहकारी सोसायट्यांमधून कर्ज घेतले व शेतात ट्युबवेल मारले. महावितरण कंपनीकडे डिमांड भरून विद्युत कनेक्शन मिळण्याकरिता अर्ज सादर केले. मात्र शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही वीज कनेक्शन मिळालेले नाही. अनेक शेतकऱ्यांचे अर्ज कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची विनाकारण व्याज भरावे लागत असल्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पन्न वाढवून आर्थिक विकासाच्या अपेक्षा केल्या होत्या, त्यांच्यावर चुकीच्या धोरणामुळे उपासमारी व आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे विद्युत जोडणी करून द्यावी, अशी मागणी साखळी उपोषणातून करण्यात येत आहे. सन राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत तालुक्यासह मंजूर झालेल्या कामात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. उपोषणाला माजी नगराध्यक्ष विलास टिपले, डॉ. विजय देवतळे, लक्ष्मणराव गमे, पं. स. सभापती सुनंदाताई जीवतोडे, वसंतराव विधाते, अनिल वरखडे यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला. मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू, असे छोटू भाई शेख यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार
आ. विजय वडेट्टीवार यांनी उपोषकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नव्या जिल्हाधिकाऱ्यांशी या विषयावर बैठक घेऊन चर्चा करणार आहे. चर्चेनंतरही मागण्या निकाली न निघाल्यास आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, सभापती सुनंदा जिवतोडे, गिरीधर काळी, वसंतराव विधाते, कादर शेख, सचिन मेश्राम, गणराज भिवदरे उपस्थित होते.

Web Title: Varora City Congress Committee's fasting started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.