चितेगाव येथील वनाची नासधूस
By Admin | Updated: August 10, 2016 00:30 IST2016-08-10T00:30:51+5:302016-08-10T00:30:51+5:30
संरक्षीत वनाची नासधूस केल्याप्रकरणी चंद्रपूर येथील एकाचे पोकलॅड जप्त करण्यात आले असून...

चितेगाव येथील वनाची नासधूस
पोकलॅड जप्त : वनविभागाची कारवाई
मूल : संरक्षीत वनाची नासधूस केल्याप्रकरणी चंद्रपूर येथील एकाचे पोकलॅड जप्त करण्यात आले असून वनविभागाने पोकलॅड मालकावर गुन्हा दाखल केला. सदर प्रकार मूल तालुक्यातील चितेगाव येथील कक्ष क्र. १७७८ मध्ये मंगळवारी घडला.
पर्यावरणाचे समतोल राखण्याच्या दृष्टीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनदिनानिमीत्त राज्यात दोन कोटी वृक्षलागवड केली आहे. परंतु, सावली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या मूल तालुक्यातील चितेगाव येथील कक्ष क्र. १७७८ मध्ये चंद्रपूर येथील मोहम्मद शाहरुख शेख यांनी स्वत:च्या मालकीची पोकलॅड चालवून संरक्षीत वनक्षेत्राची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक येडकेवार, वनरक्षक चौधरी यांनी घटनास्थळावर जावून पंचनामा केला. यावेळी पोकलॅडचा वापर करुन सुमारे २०० मीटरच्या झाडांची नासधुस केल्याचे आढळले. वनविभागाने चौकशी करुन पोकलॅड मालक मोहम्मद शाखरुख शेख यांच्यावर भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम ३२ (१), ३३ (१), ५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोकलॅड जप्त करुन वनविभागाच्या ताब्यात ठेवले असून पुढील तपास वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक येडकेवार करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
वाळू चोरीसाठी पोकलॅडचा वापर
सदर पोकलॅडचा वापर विनापरवानगी मरेगाव घाटातून वाळूचा उपसा करण्यासाठी होत असल्याची चर्चा मूल शहरात आहे. मूलच्या तहसीलदारानी नुकतेच सहा ट्रकवर कारवाई केली. जप्त केलेल्या ट्रकांमध्ये याच पोकलॅडचा वापर करुन वाळू अवैधरित्या भरण्यात येत असल्याची शंकाही आता नागरिक व्यक्त करीत आहेत.