जिल्ह्यातील २०० व्यक्तींना कोरोनाचे अभिरूप लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:46+5:302021-01-09T04:23:46+5:30
चंद्रपूर : कोविड १९ साथरोगाच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील चार केंदावर लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजे ...

जिल्ह्यातील २०० व्यक्तींना कोरोनाचे अभिरूप लसीकरण
चंद्रपूर : कोविड १९ साथरोगाच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील चार केंदावर लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजे ड्राय-रन यशस्वी झाले. यामध्ये २०० व्यक्तींना अभिरूप लस देण्यात आली. संभाव्य बहुतांश अडचणींचा अंदाज घेऊन त्यासंदर्भात तालीम पूर्ण झाली. मात्र, येत्या काही महिन्यात होणा-या प्रत्यक्ष लसीकरणातूनच को-विन ची खरी क्षमता समजणार आहे. केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींना परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी राज्यभरात अभिरूप लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यात चार केंद्र तयार करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर शहरातील रामनगर परिसरात युपीएससी-२ श्री रामचंद्र हिंदी शाळा, दुर्गापूर, जिल्हा सामान्य रूग्णालय आणि वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयाचा समावेश होता. या केंद्रावर प्रत्येकी २५ प्रमाणे २०० व्यक्तींना अभिरूप लस देण्याची तालीम घेण्यात आली. ही प्रक्रिया सकाळी ९. ३० ते दुपारी १ वाजता दरम्यान पूर्ण झाली. जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरूण हुमेन यांनी ड्राय रनचा आढावा घेतला. श्री रामचंद्र हिंदी शाळेतील केंद्राला महापौर राखी कंचर्लावर, आयुक्ता राजेश मोहिते यांनी भेट दिली. यावेळी नगरसेवक राहुल घोटेकर, देवानंद वाढई, रवी आसवानी, छबूताई वैरागडे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. अश्विनी येडे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अशी झाली संभाव्य अडचणींची तालीम
कोरोना प्रतिबंधाची लस घेतल्यानंतर रिॲक्शन झाल्यास काय करावे, को- विन ॲपमध्ये संबंधित व्यक्तीची आयडी मॅच झाली नाही तर तात्काळ उपाय कोणता, लसीसाठी नकार मिळाल्यानंतर परत आलेल्या व्यक्तींचे काय करायचे, लस साठवून ठेवलेल्या ठिकाणापासून प्रत्यक्षात केंद्रापर्यंत लस आल्यानंतर काय प्रक्रिया करायची, यासारख्या संभाव्य अडचणींवर रंगीत तालीम झाली.
अन् मोबाईलवर आला लस टोचल्याचा संदेश
ड्राय-रनमध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी सहभागी झाले. लस टोचल्याची रंगीत तालीम त्यांच्यावरच करण्यात आली. को- विन ॲपमध्ये नोंदवून अभिरूप लस टोचल्याचे सबमीट करताच संबंधित कर्मचा-यांच्या मोबाईलवर संदेश आला.