१४ आदर्श गाव प्रकल्पात उखर्डा गाव

By Admin | Updated: December 21, 2015 01:13 IST2015-12-21T01:13:22+5:302015-12-21T01:13:22+5:30

राज्य शासनाने आदर्श गाव प्रकल्पात राज्यातील दोनशे गावांची निवड केली. त्यातील १४ गावांनी आदर्श गाव प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे.

Uttarakhand village in 14 Adarsh ​​village project | १४ आदर्श गाव प्रकल्पात उखर्डा गाव

१४ आदर्श गाव प्रकल्पात उखर्डा गाव

स्वच्छता अभियानात नावलौकिक : मूल तालुक्यातील राजगडचाही समावेश
प्रविण खिरटकर वरोरा
राज्य शासनाने आदर्श गाव प्रकल्पात राज्यातील दोनशे गावांची निवड केली. त्यातील १४ गावांनी आदर्श गाव प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड व वरोरा तालुक्यातील उखर्डा गावांचा समावेश आहे.
वरोरा तालुक्यातील ६०० लोकसंख्या असलेल्या उखर्डा गावात १३० कुटुंबे आहेत. १२९४ हेक्टर शेत जमीन आहे. त्यातील अकराशे हेक्टर जमिनीवर नागरिक पिके घेत आहेत. उखर्डा गावात सन २००० पासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.
त्यात संपूर्ण गाव सहभागी होत असते. ग्रामस्थांनी श्रमदानातून अनेक कामे केली आहेत. शासकीय जमिनी श्रमदानातून स्वच्छ करीत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्याचे संगोपन केल्याने झाडे आता डोलाने उभे आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांचा आदर्श ठेवीत असे एक ना अनेक कामे श्रमदानातून ग्रामस्थांनी केली आहेत.
सप्तसूत्रीेचे पालन, पानलोट विकास कामे, एक गाव एक गणपती, एकच दुर्गा देवी असे अनेक उपक्रम उखर्डा ग्रामस्थांनी राबविल्याने उखर्डा गावाला शासनाचा तालुका स्तरावरील दोनदा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे.
आता उखर्डा गावाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळून गावातील कामे पूर्णत्वास येणार आहे.

गावाचा एकोपा अचानक सहा वर्ष थांबला
सन २००० पासून उखर्डा गावात एकोप्याने सर्व काही सुरु असताना सन २००६ मध्ये निवडणूका आल्याने गाव दुभंगले व एकोपा तुटला. अनेकांची मने दुखावली. त्यामुळे उखर्डा गावाचा विकास ठप्प झाला होता. गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराची लोकचळवळ उभारणारे निवृत्त शिक्षक भाऊराव वैद्य कमालीचे अस्वस्थ होवून गेले. त्यांना काही कळेनासे झाले. परंतु विचार विकास सामाजिक संस्था वरोराचे किशोर चौधरी यांनी भाऊराव वैद्य यांना उखर्डा गावात उपक्रम सुरु करण्याबाबत विनवनी केली. परंतु एवढे दुंभगलेले गाव एकत्र आणणार कसे असे म्हणत प्रारंभी भाऊराव वैद्य यांनी नकार दिला. किशोर चौधरी यांनी आपला हेका सोडला नाही. त्यामुळे भाऊराव वैद्य यांनी होकार देवून किशोर चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यासह उखर्डा गावात जावून भेट दिली. नागरिकांची मने जिंकत परत सहा वर्ष थांबलेले ग्रामस्वच्छता अभियान २०१२ पासून सुरु झाले. ते आजही अविरतपणे सुरु आहे.

पोपटराव पवारांची उखर्डा
गावास भेट
१२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी उखर्डा गावात भेट देवून पानलोट विकास कामे, श्रमदानाची, स्वच्छतेची पाहणी करीत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे अतिरिक्त कृषी मुख्य सचिव डी.के. जैन, अपर सचिव कराड, उपसंचालक जगताप, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे, उपविभागीय कृषी अधिकारी राजवाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Uttarakhand village in 14 Adarsh ​​village project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.