शासकीय कामात चोरीच्या रेतीचा वापर
By Admin | Updated: April 10, 2016 00:59 IST2016-04-10T00:59:29+5:302016-04-10T00:59:29+5:30
शासकीय कामात खनिज उत्खननाचा परवाना न घेता चोरीच्या रेतीचा वापर होत आहे.

शासकीय कामात चोरीच्या रेतीचा वापर
तहसीलदारांकडून चौकशी : कारवाईचे आश्वासन
कोरपना : शासकीय कामात खनिज उत्खननाचा परवाना न घेता चोरीच्या रेतीचा वापर होत आहे. कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथील कामाची कोरपना तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. तहसीलदार पुष्पलता कुमरे यांनी तक्रारीची दखल घेऊन कामाच्या स्थळी भेट दिली व ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
नांदाफाटा येथे दलित वस्ती अंतर्गत ६ लाख ३० हजार रूपयांच्या सिमेंट कांक्रीट रस्त्याचे काम वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सुरू आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी इरई बोरगाव नदीतील काळ्या रंगाची रेती चोरून काम सुरू असल्याची तक्रार राजू काळे यांनी कोरपनाच्या तहसीलदार पुष्पा कुमरे यांच्याकडे केली. कुमरे यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन गुरूवारी कामाच्या स्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच पाच-सहा ट्रॅक्टर रेती जप्त केली.
कोरपना तालुक्यात अनेक ग्रामपंचायती व पंचायत समिती स्तरावरील बांधकामात विना खनिज परवान्याचा रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे.
यामुळे नदी नाल्याचे खोलीकरण होत असून भविष्यात पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तहसीलदार पुष्पा कुमरे यांनी चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर व दोषी शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारकर्ते राजू बाळकृष्ण काळे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)