दारू तस्करीसाठी होतोयं स्कूल बॅगचा वापर

By Admin | Updated: October 14, 2015 01:17 IST2015-10-14T01:17:06+5:302015-10-14T01:17:06+5:30

जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर तस्करांकडून दारूच्या तस्करीसाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत.

Use of School Bag for smuggling alcohol | दारू तस्करीसाठी होतोयं स्कूल बॅगचा वापर

दारू तस्करीसाठी होतोयं स्कूल बॅगचा वापर

तस्करांचा नवा फंडा : तरूणाई उतरली दारूच्या काळ्या धंद्यात
चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर तस्करांकडून दारूच्या तस्करीसाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. यातील अनेक युक्ता वापरून झाल्यानंतर पोलिसांनी त्या उजेडात आणल्या खऱ्या; पण तस्करांकडून कल्पनेच्या पलिकडील युक्ता वापरल्या जात असल्याने पोलीस यंत्रणाही हैराण झाली आहे. अलिकडे दारू तस्करीसाठी चक्क स्कूल बॅगचा वापर केला जात आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला दारूचा पुरवठा करणारे वणी हे मुख्य केंद्र बनत चालले आहे. तेथील काही तस्कर दारू पुरवठ्यासाठी महिलांचा वापर करीत आहे. मोठी रक्कम देऊन विविध मार्गाने महिलांना चंद्रपुरात दारू घेऊन पाठविले जात आहे. दोन महिन्यापूर्वी महाकाली पोलीस चौकीतील जागृत पोलीस कर्मचाऱ्यांनीच अशी तस्करी उजेडात आणली. थोडी ‘रिस्क’ घेतली तर अगदी कमी वेळात दुप्पट कमाई देणाऱ्या या काळ्या धंद्यात जिल्ह्यात जवळपास पाच हजार लोक उतरले असल्याची चर्चा आहे. हे लोक वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून अन्य जिल्ह्यातून येथे दारू आणत आहेत. दिवसेंदिवस केवळ शहरातच नव्हे तर जिल्हाभरात चिल्लर दारू विक्रेत्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यातूनच ‘स्कूल बॅग’ ची शक्कल लढविल्या गेली. अगदी महाविद्यालयीन विद्यार्थ्यासारखा पहेराव करून पाठीवर स्कूलबॅग अडकविली जाते. त्यात पुस्तकाऐवजी दारूच्या बॉटल असतात. अशीच एक घटना दोन आठवड्यापूर्वी नागपूर मार्गावर पोलिसांनी उजेडात आणली होती.
या प्रकरणातील आरोपी पोलिसांना पाहून मोटारसायकल व स्कूल बॅग घटनास्थळावरच सोडून पसार झाले होते, हे विशेष. (प्रतिनिधी)
ओळखायचे कसे, पोलिसांपुढे पेच
अगदी सामान्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसारख्या दिसणाऱ्या या दारू तस्करांना नेमके ओळखायचे कसे, असा पेच पोलिसांपुढे आहे. पोलीस यंत्रणा प्रत्येकाचीच झडती घेऊ शकत नाही. ज्याचा संशय येईल, किंवा गोपनिय माहिती मिळेल, त्यांचीच पोलिसांकडून चौकशी केली जाते. ही बाब हेरून अतिशय गुप्तरित्या ही तस्करी सुरू आहे.
चंद्रपुरात ‘गर्द’चा शिरकाव
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर व्यसनी लोकांनी अन्य पर्याय शोधणे सुरू केले. काहींनी गांजाला जवळ केले तर, गर्दसारख्या घातक अंमली पदार्थाच्या आहारीही तरूणाई गेली. शहरात गर्दची विक्री करणाऱ्या तिघांना रामनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली. या कारवाईत या तस्करांजवळून दोन चाकू व मोटारसायकल तसेच ७०० रुपये किमतीची १.४० ग्रॅम गर्द पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक सुशिलकुमार नायक, रामनगरचे ठाणेदार संपत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.के.बारसे यांनी केली.

Web Title: Use of School Bag for smuggling alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.