कोरोना काळात बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:00+5:302021-04-02T04:29:00+5:30
चंद्रपूर : राज्यात प्लास्टिक बंदी आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरणे तसेच ग्राहकांना देण्यावर निर्बंध आहे. असे असले तरी ...

कोरोना काळात बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
चंद्रपूर : राज्यात प्लास्टिक बंदी आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरणे तसेच ग्राहकांना देण्यावर निर्बंध आहे. असे असले तरी मागील वर्षभरापासून गठित केलेले पथक गायब झाल्याने बाजारामध्ये सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. विशेष म्हणजे, पडोली, बंगाली कॅम्प तसेच गांधी चौकातील भाजी बाजारामध्ये प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना दिल्या जात आहे. यामुळे प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे झोपी गेलेल्या पथकांनी उठून कारवाई करणे गरजेचे आहे.
शहरामध्ये काही दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. यामुळे पर्यावरण संतुलन धोक्यात आले आहे. युज ॲण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. दुसरीकडे नागरिकांकडून प्लास्टिकचा होणारा अनिर्बंध वापर, शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याचेच चित्र सध्या जिथे तिथे बघायला मिळत आहे. शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी विषयी गांभीर्य नसल्याचे चित्र सध्या चंदपूर शहरात बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे, हा वापर येणाऱ्या पावसाळ्यात सर्वांसाठीच घातक ठरणार आहे.
बाॅक्स
जनावरांना धोका
शहरातील कानाकोपऱ्यात वसलेले अनेक व्यावसायिकांकडे प्लास्टिक पिशवी बघायला मिळत आहे. पान ठेल्यावर ग्राहक खर्रा खाऊन झाल्यावर प्लास्टिक पन्नी तशीच रस्त्यावर फेकून देतात. ती उडत रस्त्यावर आल्याने शहराच्या सौंदर्यात बाधा पडत आहे. एकीकडे महापालिका स्वच्छतेबाबत प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रस्त्यावरील या पन्न्या शहराच्या सौंदर्यात बाधा आणत आहे. त्यातही प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नसल्याने त्या इतरत्र पडलेल्या दिसून येतात. बहुतेक जनावरे त्या चार म्हणून खातात. त्यामुळे अनेक जनावरांचा जीव सुद्धा गेला आहे.
कोट
शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या पडून असतात. त्या मोकाट जनावरे खातात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण तसेच पशुंच्या आरोग्यासाठी प्लास्टिक पिशव्यांच्या अनिर्बंध वापरावर त्वरित आळा घालणे गरजेचे आहे.
-देवेंद्र रापेल्ली
अध्यक्ष, प्यार फाउंडेशन, चंद्रपूर