शीतपेय तयार करताना अशुद्ध पाण्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST2021-03-06T04:27:22+5:302021-03-06T04:27:22+5:30
दोन आठवड्यांपासून शहरातील तापमानात वाढ झाली. दुपारी उन्हाचे चटके बसू लागल्याने शहरातील गांधी चौक, कस्तुरबा मार्ग, बंगाली कॅम्प, बाबूपेठ, ...

शीतपेय तयार करताना अशुद्ध पाण्याचा वापर
दोन आठवड्यांपासून शहरातील तापमानात वाढ झाली. दुपारी उन्हाचे चटके बसू लागल्याने शहरातील गांधी चौक, कस्तुरबा मार्ग, बंगाली कॅम्प, बाबूपेठ, बागला चौक, तुकूम, दुर्गापूर तसेच विविध मार्गांवर शीतपेयांचे हातठेले सुरू झाले. उन्हामुळे आइसक्रीम पार्लर, ज्युस व रसवंती ठेल्यांसमोर युवक-युवतींची गर्दी दिसत आहे. शीतपेये तयार करण्यासाठी बर्फाची गरज भासते. चंद्रपूर शहरात बर्फनिर्मिती करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र, याकरिता अशुद्ध पाण्याचा वापर सुरू असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. बर्फ निर्मिती करताना पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे लागतात. अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. तपासणीनंतरच संबंधित विभागाकडून परवानगी दिली जाते. परंतु, बऱ्याच व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष करून बर्फ उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. कोरोना संसर्गाच्या काळात प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही, तर गर्दीमुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते.
शीतपेयांची तपासणी करावी
शीतपेये तयार करताना अशुद्ध पाण्याचा वापर सुरू असल्याने चंद्रपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशुद्ध पाण्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे महापालिका, अन्न व औषध प्रशासनाने सोडामिश्रित शीतपेये, रस्त्यावरील सरबते व फळांचे रस यांची तपासणी मोहीम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दुर्धर आजारांना निमंत्रण
कृत्रिम पेयामुळे दुर्धर आजारांना निमंत्रण मिळते. अशा पेयांमध्ये कॅपिन, घातक रंग, कॉबर्न डायऑक्साईड, अॅल्युमिनियम आदीचा वापर केला जातो. अशा घटकांमुळे शरीराचे संतुलन बिघडते. प्रतिकारशक्ती कमी होते. कोरोना संसर्ग काळात हे अत्यंत धोकादायक असल्याची माहिती चंद्रपुरातील आहारतज्ज्ञ डॉ. श्रीपाद डुमरे यांनी दिली.
उन्हाच्या काहिलीत लिंबू रसाला पसंती
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू रसाला अत्यंत महत्त्व आहे. शरीरातील ऊर्जा टिकविण्यासाठी लिंबू पाणी व सरबत उत्तम पर्याय असल्याने नागरिकांची विशेष पसंती आहे. काही दिवसांपूर्वी १० रुपयांना चार लिंबू मिळत होते. आता मागणी वाढल्याने दोनच लिंबू मिळतात.