ग्रामपंचायत मजुरांचा कंत्राटदारांकडून वापर

By Admin | Updated: April 2, 2015 01:28 IST2015-04-02T01:28:02+5:302015-04-02T01:28:02+5:30

येथील ग्रामपंचायतीच्या मजुरांचा चक्क कंत्राटदारांकडून वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.

Use of Gram Panchayat Workers from Contractors | ग्रामपंचायत मजुरांचा कंत्राटदारांकडून वापर

ग्रामपंचायत मजुरांचा कंत्राटदारांकडून वापर

घुग्घुस : येथील ग्रामपंचायतीच्या मजुरांचा चक्क कंत्राटदारांकडून वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. सत्ताधारी सदस्याकडूनच मजुराचा दुरुपयोग होत असला तरी त्यांच्याकडून ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेतली जात आहे. दरम्यान यातून ग्रामपंचायतीच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप विरोधी सदस्य प्रकाश बोबडे यांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निपक्षपात चौकशी करावी व सत्यता उघड करावी आणि दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घुग्घुस ग्रामपंचायतीमध्ये या पंचवार्षिकमध्ये बहुमतात भाजपची सत्ता आहे. गावात विविध वॉर्डात विविध फंडातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामे केली जात आहेत. कामे अप्रत्यक्षपणे सत्ताधारी सदस्य करीत आहेत. मात्र बिल एका विशिष्ट ठेकेदाराच्या नावाने काढण्यात येत असल्याबी बाब आता सर्वश्रुत आहे. सदर सदस्याकडून त्या कामात चक्क ग्रामपंचायतीचे मजूर वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. २७ मार्चच्या मासिक सभेत विरोधी सदस्य व भाजप सत्ताधारी सरपंचांव्यतिरिक्त एकही सदस्य उपस्थित झाला नाही. त्यामुळे कोरमअभावी सभा तहकूब करावी लागली होती. काल (दि. ३१) स्थगित झालेली सभा पुन्हा घेण्यात आली. त्यात विरोधी सदस्य प्रकाश बोबडे यांनी ग्रामपंचायत मजुरांचा गैरवापर हा मुद्दा उचलून धरला. संबंधित ग्रामपंचायतीच्या सुपरवायझरला बोलाविण्यात आले आणि विचारणा करण्यात आली. मात्र तत्पूर्वी ज्या सदस्यांनी हा प्रकार केला होता, त्यांच्याकडून दबाव तंत्राचा वापर केल्याने ती बाजू सुपरवायझरने आपल्या अंगावर घेतली. तेव्हा सदर सुपरवायझरला निलंबित करण्याची गळ विरोधी सदस्यांनी घातली. सुपरवायझर चंदू घागरगुंडे यांनी चूक लिहून देण्याची कबूल केले असले तरी आजही लिहून दिलेले नाही. ग्रामपंचायतीकडून विरोधी सदस्य प्रकाश बोबडे यांनी मजुरांच्या मस्टरची कॉपी मिळविली. त्यात २१ मार्च व २५ मार्चच्या मस्टरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन मजूर लावले अशी नोंद आहे. मात्र त्यावर रेषा मारून खोडतोड करून दुसऱ्या वॉर्डाचे नाव लिहिले आहे. खोडतोड केल्याची कबुली सभेत सुपरवायझर यांनी दिली. असे असले तरी सत्ताधारी सदस्यांनी गोंधळ घालून प्रकरणाला बगल दिली असा आरोप प्रकाश बोबडे यांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Use of Gram Panchayat Workers from Contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.