जिल्ह्यासाठी युरिया खत उपलब्ध
By Admin | Updated: September 21, 2014 23:48 IST2014-09-21T23:48:08+5:302014-09-21T23:48:08+5:30
जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवू लागला होता. तक्रारींचा ओघ वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने वरिष्ठ अधिकारी व कंपन्यांकडून तगादा लावून जिल्ह्यासाठी युरियाची रॅक

जिल्ह्यासाठी युरिया खत उपलब्ध
चंद्रपूर : जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवू लागला होता. तक्रारींचा ओघ वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने वरिष्ठ अधिकारी व कंपन्यांकडून तगादा लावून जिल्ह्यासाठी युरियाची रॅक मिळवण्यात यश मिळविल आहे. रविवारी २८२४ मेट्रिक टन खताची रॅक लागली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्क्यावर चोख बंदोबस्तात जिल्ह्यातील सुमारे २०० केंद्रांवर खत रवाना केले.
कृषी आयुक्तालयाकडून जिल्हाभरासाठी सप्टेंबर महिन्यात ५१०० मेट्रिक टन युरियाचे आवंटन देण्यात आले होते. त्यानुसार आरसीएफची पहिली रॅक ८ सप्टेंबरला वितरित करण्यात आली. २६०० मेट्रिक टनच्या खतामुळे जिल्ह्याची गरज भागत नव्हती. त्यामुळे पुन्हा युरियाची रॅक मिळविण्यासाठी कृषी विभागाने परिश्रम घेतले. रविवारी ही रॅक लागताच व जिल्ह्यातील युरियाची मागणी पाहता अधिकाऱ्यांनी रॅक पाईटवर जागोजागी कर्मचाऱ्यांना तैनात करुन खताचे वितरण सुरु केले.
पहाटेपासून तालुकास्तरावर खत रवाना होत असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व तालुकास्तरावर युरिया पोहोचणार आहे. संबंधित केंद्रावर खत पोहोचल्यानंतर तालुक्यातील वितरणाची जबाबदारी तालुका कृषी अधिकाऱ्यांची राहणार असून त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच युरियाचे वाटप होणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युरिया मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे प्रयत्न असून जिल्हाभरात किमान २५० अधिकारी व कर्मचारी युरियाच्या वितरणावर नजर ठेवून राहणार आहे.
उशिरा आलेल्या पावसामुळे अचानक युरियाची मागणी वाढली होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा तुटवडा सुद्धा निर्माण झाला होता. त्यामुळे कृषी विभागाने सप्टेंबर महिन्यात आलेल्या दोन्ही रॅकचे व्यवस्थीत नियोजन केल्याने प्रत्येक तालुक्यात मागणीनुसार युरियाचा पुरवठा होणार आहे. यापूर्वी गेल्या ३० वर्षात रॅक पार्इंटवर कधीही कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले नव्हते. परंतु रविवारी पहिल्यांदा ट्रान्सपोर्ट चालक व अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)