जिल्हाभर बेमुदत लेखणीबंद आंदोलन
By Admin | Updated: February 10, 2016 00:51 IST2016-02-10T00:51:31+5:302016-02-10T00:51:31+5:30
तलाठ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप करीत विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघाच्या जिल्हा शाखेने ...

जिल्हाभर बेमुदत लेखणीबंद आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तलाठी प्रथमच रस्त्यावर
चंद्रपूर : तलाठ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप करीत विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघाच्या जिल्हा शाखेने बुधवारी १० फेब्रुवारीपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महसूल विभागाचे ग्रामीण पातळीवरील काम ठप्प पडणार असून निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा संघटनेने दिल्याने पेच निर्माण झाला आहे.
या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्वच तलाठी आणि मंडळ अधिकारी सहभागी होत असल्याने काम ठप्प पडण्याची शक्यता आहे. ३०० तलाठी आणि ५० मंडळ अधिकारी सहभागी होत आहेत. आंदोलनाच्या व्यूहरचनेनुसार, बुधवारी सकाळी आपल्या कार्यालयाला सील लावून तलाठी त्या किल्ल्या तहसीलदारांना सोपविणार आहेत. त्यानंतर उपविभागीय अधिकारी स्तरावर त्यांच्या कार्यालयासमोर सर्र्व तलाठी आणि मंडळ अधिकारी आंदोलनाला बसणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांविरोधात प्रथमच तलाठी रस्त्यावर उतरत असल्याने या आंदोलनाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
तलाठ्यांच्या अनेक मागण्या मागील पाच वर्षांपासून प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. कालबद्ध पदोन्नतीची मागणी मागील तीन वर्षांपासून रेंगाळली आहे. अनेक तलाठ्यांची सेवा प्रदीर्घ झाली असूनही अद्यापही ज्येष्ठता यादी प्रकाशित झालेली नाही. मंडळ अधिकाऱ्यांची अनेक पदे जिल्ह्यात रिक्त असल्याने तलाठ्यांवरचा कामाचा भार वाढला शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसल्याने ग्रामीणांच्या असंतोषाला तलाठ्यांना सामोरे जावे लागते. या मागण्यांसंदर्भात मागील अनेक काळापासून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. मात्र महसूल विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कसलीही दखल घेतली नाही, असा संघाचा आरोप आहे.
२२ सप्टेंबरला विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघाच्या जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून शिष्ठमंडळासोबत चर्चा केली होती. त्यावर लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाले होते. प्रतीक्षा करूनही पूर्तना न झाल्याने पुन्हा शिष्टमंडळाने निवेदन देवून चर्चा केली होती. तोडगा न निघाल्याने अखेर संघाने हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
१ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या काळात तलाठ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती बांधून काम केले. त्याची दखल न झाल्याने ९ फेब्रुवारीला सामूहिक रजा आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता जिलञ्याधिकाऱ्यांशी चर्चा ठरली, मात्र निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी येवून चर्चा केली. ती असफल झाल्याने अखेर १० फेब्रुवारीपासून बेमुदत लेखनीबंद आंदोलन पुकारण्याचे संघाने जाहीर केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
तलाठ्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यातील काही मागण्या आपल्या स्तरावर आहेत, तर काही वरिष्ठ स्तरावर आहेत. पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. अन्य मागण्याही आठवडाभरात पूर्ण होतील. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यांना पुन्हा १२ तारखेला चर्चेसाठी वेळ दिला आहे.
- डॉ. दीपक म्हैसेकर
जिल्हाधिकारी, चंद्रपूर
संघाच्या मागण्या मागील अनेक वर्षांंपासून प्रलंबित आहेत. काही मागण्या तर २५ वर्षांपासूनच्या आहेत, मात्र जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत. परिणामत: नाईलाजाने हे आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आहे.
- संपत कन्नाके
सचिव, विदर्भ पटवारी संघ, जिल्हा शाखा