यावेळी होत असलेल्या दोन गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणुकीत होणारा त्रास, पैशाचा खर्च व आरोप-प्रत्यारोपाला मूठमाती देत दोन्ही ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. हेच सध्याच्या काळात आवश्यक असून, राजगड व उथडपेठ या दोन ग्रामपंचायती प्रेरणादायी ठरल्या आहेत.
मूल तालुक्यात ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. असे असले तरी तालुक्यातील राजगड व उथडपेठ या दोन गावांनी निवडणूक न घेता बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न केला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राजगडने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आपली अमिट छाप उमटविणारे राजगड गाव आजही प्रेरणादायी आहे. स्वच्छता अभियानाचे प्रेरणास्रोत माजी सरपंच चंदू मारकवार आहेत. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून मागील महिन्यात संशयास्पद अपघातात मृत्यू पावलेले संजय मारकवार यांची भूमिकादेखील गाव विकासात राजकारणाला थारा न देणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच राजगड गावात निवडणुका न घेता बिनविरोध करण्याची परंपरा कायम राखल्याचे दिसून येते. दुसरे गाव आहे उथडपेठ. या गावात यावर्षी निवडणुका न घेता बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्राचे माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हे गाव दत्तक घेऊन गाव विकासाला हातभर लावला होता.