बेरोजगारांचा असंतोष रस्त्यावर
By Admin | Updated: March 14, 2015 01:07 IST2015-03-14T01:07:42+5:302015-03-14T01:07:42+5:30
न्याय व विधी विभागातील गट क, व गट ड पदाची भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. इतर विभागातील पदेही याच पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

बेरोजगारांचा असंतोष रस्त्यावर
चंद्रपूर : न्याय व विधी विभागातील गट क, व गट ड पदाची भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. इतर विभागातील पदेही याच पद्धतीने भरण्यात येणार आहेत. शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून या निर्णयाच्या विरोधात जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांचा असंतोष शुक्रवारी रस्त्यावर उतरला. सुशिक्षीत बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार व आयुक्त कार्यालयार्तंगत विविध कार्यालये येतात. तसेच या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली विविध मंडळे आणि क्षेत्रीय कार्यालये येतात. मात्र, येथील गट क व गट ड ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय तातडीने रद्द करून भरती प्रक्रिया पुर्ववत शासकीय पद्धतीने घेण्यात यावी, महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांचे परीक्षा केंद्र हे जिल्ह्याच्या ठिकाणी देण्यात यावे आदी मागण्या बेरोजगारांनी निवेदनात केल्या. शासकीय ग्रंथालयापासून मोर्चाची सुरूवात करण्यात आली. गांधी चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात श्रीकांत साव, सतीश खोब्रागडे, सतीश काकडे, अविनाश सारोकर, पराग जिझिवार, शुद्धोधन रायपुरे, महेश सोयाम, शितल वाकडे, सविता उंदिरवाडे, रोमा बिश्वास, साजिद शेख यांच्यासह हजारो बेरोजगारांचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)