नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2017 00:38 IST2017-05-28T00:38:08+5:302017-05-28T00:38:08+5:30
राजुरा तालुक्यातील रामपूर येथील चार युवकांना माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये नोकरी मिळवून देतो म्हणून खोटी आर्डर देऊन ६ लाख ५० हजारांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.

नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक
सहा लाखांनी गंडविले : माणिकगड सिमेंटची खोटी आर्डर दिली
बी.डू. बोर्डेवार । लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा तालुक्यातील रामपूर येथील चार युवकांना माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये नोकरी मिळवून देतो म्हणून खोटी आर्डर देऊन ६ लाख ५० हजारांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.
राजुरा तालुक्यातील रामपूर येथील सतिश थेरे, संजय थेरे, राहुल थेरे आणि सचिन गौरकार हे नोकरीसाठी फिरत असताना बल्लारपूर येथील तीन युवकांनी या बेरोजगार युवकांना हेरून प्रथम चारही बेरोजगार युवकांकडून पन्नास हजार रुपयेप्रमाणे दोन लाख रुपये घेतले. काही दिवसानंतर माणिकगड सिमेंट कंपनीची आर्डर तयार आहे. तुम्ही प्रत्येक दोन लाख २५ हजार आणून द्या आणि आर्डर घेऊन जा, असे त्या युवकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर सचिन गौरकार आणि सतिश थेरे यांनी दोघांचे मिळून चार लाख ५० हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतर माणिकगड सिमेंट कंपनीचे ‘प्रॉडक्शन ट्रेडसमन जनरल गेड-२’ या पदाचे खोटे नियुक्ती पत्र सचिन गौरकार आणि सतीश थेरे यांना देण्यात आले. या नियुक्तीपत्रावर कंपनीचा लोगो असून चिफ एक्झ्युक्युटिव्ह एम.व्ही. खातमोडे यांची स्वाक्षरी आहे. ही आर्डर घेऊन दोघेही कंपनीत गेले असता खोटी आर्डर असल्याचे निदर्शनास आले.
फसवणूक करणाऱ्यांनी एका शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर काम झाले नाही तर पैसे परत करण्याचे लिहूनसुद्धा दिले होते.
सोबतच अॅक्सीस बँकेचा चेकसुद्धा दिला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिन आणि सतीश हे बँकेत चेक घेऊन गेले असता अनेक दिवसांपूर्वीच खाते बंद झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही युवकांनी अॅड. निनाद येरणे यांच्याशी संपर्क साधून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यात आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतानासुद्धा प्रचंड बेरोजगारीमुळे सुशिक्षित बेरोजगार युवक अशा बोगस नोकरी देणाऱ्याच्या जाळ्यात अलगद अडकले जाऊन लाखो रुपयांची लूट होत आहे.
फसवणूक करणाऱ्यावर कडक कारवाई करा
बल्लारपूर येथील तीन युवकांनी बोगस आर्डर देऊन शेकडो बेरोजगाराची फसवणूक केली आहे. आमच्याकडून माणिकगड सिमेंट कंपनीची बोगस आर्डर देऊन सहा लाख ५० हजार रुपये नगदी घेतले. आर्थिक परिस्थिती हलाकीची असतानासुद्धा पैसे दिले. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या बोगस व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी रामपूर येथील सतीश थेरे यांनी केली आहे.