दारू व्यवसायात उतरली बेरोजगारांची फौज
By Admin | Updated: September 10, 2015 00:48 IST2015-09-10T00:48:08+5:302015-09-10T00:48:08+5:30
राज्य शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करुन दारू तस्करांना रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले.

दारू व्यवसायात उतरली बेरोजगारांची फौज
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी : सामाजिकदृष्ट्या अत्यंत चिंतेची बाब
गोवरी : राज्य शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करुन दारू तस्करांना रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे जिल्हाभरात सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. दारूमुळे विस्कटलेले संसार पुन्हा सावरेल, असे वाटत असतानाच दामदुप्पट नफा कमविण्याच्या उद्देशाने दारू तस्करी वाढली. आता तर या काळ्या व्यवसायात जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची फौज उतरल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणपिढीच या व्यवसायात आल्याने सामाजिक आरोग्यही बिघडण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून दारू तस्करांवर आळा घालण्यासाठी राज्य व जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस तपासणी नाके उभारण्यात आले. मात्र दारू तस्कर नवनवीन शक्कल लढवून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी करीत असल्याने पोलीस यंत्रणेवरचा ताण वाढला. यादरम्यान पोलिसांनी दारूतस्करांवर कारवाईचा बडगा उगारला. तर काहींनी चक्क पोलिसांशी सेटींग करुन आपले भले करुन घेतले. त्यामुळे दारू तस्करांची हिमंत वाढल्याने पोलीस आमचे काहीच बिघडवू शकत नाही असा धमकीवजा इशारा दारू तस्कर देऊ लागले आहे. हा प्रकार तस्करीचे पाळेमुळे अधीकच बळकट करणारा आहे. कुंपनच शेत खात असल्याने दाद मागायची कुणाकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशाचे भावी आधारस्तंभ समजले जाणारे युवकच दारू व्यवसायाच्या काळ्या धंद्यात उतरल्याने चिंता वाढली आहे. झटपट पैसा कमविण्याच्या नादात आयुष्याचे मातेरे करायला निघालेल्या तरुण पिढीकडून काय अपेक्षा करायची, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. परप्रांतातून दारू तस्करी करताना आडमार्गाने किंवा राज्य मार्गावर असलेल्या पोलीस तपासणी नाक्यावरुन दारू सर्रास आणली जात असताना त्याठिकाणी असणारे पोलीस काय करतात? पैशाच्या लोभापायी दारू तस्करांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देणारे पोलीस कर्मचारी काय कामाचे? पोलीसच दारू तस्करांना अभय देत असेल तर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढेल. मग यात दोष कुणाचा, असा प्रश्न निर्माण होत आहे. साऱ्या पोलीस प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा.
दारूबंदी झाल्यापासून जिल्ह्यातील परिस्थिती सुधारेल, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र यासंदर्भात असलेले चित्र अधिकच बिकट होत चालले आहे. दररोज वृत्तपत्रातून दारूतस्करी संबंधातील बातम्या प्रकाशित होतात. पोलीस कारवाई करतात. मात्र दारू तस्करी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. दारू तस्करीच्या या काळ्या व्यवसायात दुप्पट-तिप्पट नफा कमविण्याच्या हेतूने सुशिक्षित बेरोजगार युवकांची फौज अवैध दारूच्या धंद्यात उतरली असल्याने त्यांच्या भावी आयुष्याचे स्वप्न आता धूसर झाले आहे. (वार्ताहर)