रोहयों मजुरांना मिळणार बेरोजगार भत्ता
By Admin | Updated: February 1, 2016 01:10 IST2016-02-01T01:10:57+5:302016-02-01T01:10:57+5:30
रोहयो मजुरांनी काम मागितलेल्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत मजुरांना कामाची उपलब्धता करून दिली नाही.

रोहयों मजुरांना मिळणार बेरोजगार भत्ता
वडाळा (तु) : रोहयो मजुरांनी काम मागितलेल्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत मजुरांना कामाची उपलब्धता करून दिली नाही. दोषी व्यक्तींकडून बेरोजगार भत्त्याची रक्कम वसूल करून मागणीदार मजुरांना वितरीत करावी, या आशयाचे पत्र उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडून संवर्ग विकास अधिकारी भद्रावती यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे चिचोली येथील रोहयो मजुरांच्या बेरोजगार भत्त्याबाबत आशा वाढलेल्या आहे.
भद्रावती तालुक्यातील चिचोली येथील मजुरांनी रोहयो कायद्यानुसार नमुना ४ भरून १५ एप्रिल ते ३० जून २०१५ पर्यंत असे एकूण ७५ दिवसाच्या कामाची मागणी केली. अर्ज प्राप्त झाल्याची नमुना ५ मधील रितसर पावती ग्रामसेवक यांच्याकडून घेतली. नियमानुसार काम मागितल्याच्या दिनांकापासून १५ दिवसाच्या आत काम उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे मजुरांनी बेरोजगार भत्ता मिळण्याबाबतचा अर्ज तालुका कार्यक्रम अधिकारी तथा तहसीलदार भद्रावती यांच्याकडे नमुना ८ मध्ये केला. संपूर्ण कार्यालयीन प्रक्रियेतून चौकशी करून मजुरांना १५ दिवसाच्या आत काम देण्यास दिरंगाई केल्याच्या कारणावरुन तत्कालीन संबंधित ग्रामसेवक व रोजगार सेवक यांना दोषी ठरविण्यात आले.
सदर चौकशी अहवाल संवर्ग विकास अधिकारी यांनी उपजिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) चंद्रपूर यांना कार्यवाहीबाबत पाठविण्यात आला. सदर चौकशी अहवालानुसार या प्रकरणात दोषी आढळलेल्या ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्याकडून बेरोजगार भत्त्याची रक्कम वसूल करून संबंधित मजुरांना वितरित करावी व तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी ६ जानेवारी २०१६ रोजी संवर्ग विकास अधिकारी भद्रावती यांना केल्या आहेत. तसे पत्रही त्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे संवर्ग विकास अधिकारी तत्कालिन ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्याकडून बेरोजगार भत्त्याची रकम वसूल करून मजुरांच्या खात्यात जमा करण्यासाठी कोणती भूमिका घेतात, याकडे रोहयो मजुरांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)