५०० च्या नोटांवर अघोषित बंदी
By Admin | Updated: June 21, 2015 01:44 IST2015-06-21T01:44:13+5:302015-06-21T01:44:13+5:30
नकली नोट प्रकरणात चिमूर येथील व्यापाऱ्यासह एकूण सात आरोपी हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात असून कसून तपास सुरू आहे.

५०० च्या नोटांवर अघोषित बंदी
चिमूर : नकली नोट प्रकरणात चिमूर येथील व्यापाऱ्यासह एकूण सात आरोपी हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात असून कसून तपास सुरू आहे. आरोपीकडे पाचशे व हजार रुपयांच्या नकली नोटा सापडल्याने चिमूरमधील नागरिकांकडे असलेल्या खऱ्या पाचशे किंवा हजार रुपयांच्या नोटा चलनात आणताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. या नोटांवर एक प्रकारची अघोषित बंदीच घालण्यात आल्याचे दिसून येत आहे. खरी नोट असतानासुद्धा काही व्यापारी घेत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
चिमूरमधील हॉटेल व्यवसायी रमेश पटेल हे आपल्या सहकार्यासह हिंगणघाट येथे जावून नकली नोटा चलनात आणताना नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांनी पकडले होते. पोलिसांच्या दणक्याने व बाजीरावच्या धाकाने आरोपी बोलू लागले. त्यात चिमूरचा प्रतिष्ठित व्यापारी यांच्या नोकराच्या घरी असलेल्या अठरा हजारांच्या नोटा सापडल्या. यावरून पाचशे व हजारांच्या नोटाकडे दुकानदार संशयाच्या नजरेने पाहत आहेत. खरी नोट घेऊन गेल्यावरही व्यावसायिक परत पाठवित आहेत. बँकेतच नोटा चेक करण्यासाठी मशीन आहे. बऱ्याच दुकानात चेकमशीन नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेकडे असलेली पाचशे किंवा हजार रुपयांची नोट चलनात आणण्यास अडचण निर्माण झाली आहे.
पाचशे किंवा हजार रुपयाची नोट घेण्यास अघोषित बंदी झाल्याने नागरिकांत त्रस्त झाले आहेत. खरी नोटच घेण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यांनी जायचे कुठे, हा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने याबाबत जनतेत जागृती करावी, जेणेकरून सामान्य जनतेच्या अडचणी दूर होतील. (शहर प्रतिनिधी)