ऑटोरिक्षाची बेलगाम पार्किंग ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:05+5:302021-03-24T04:26:05+5:30

चंद्रपूर : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे ऑटोरिक्षाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी ऑटोरिक्षा उभे करण्यास वाहनतळ ...

Uncontrolled parking of autorickshaws is a headache | ऑटोरिक्षाची बेलगाम पार्किंग ठरतेय डोकेदुखी

ऑटोरिक्षाची बेलगाम पार्किंग ठरतेय डोकेदुखी

चंद्रपूर : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे ऑटोरिक्षाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी ऑटोरिक्षा उभे करण्यास वाहनतळ मिळत नाही. तसेच प्रवाशांसाठी ऑटोरिक्षाचालक वाटेल तिथे अ‍ॅटो थांबवत असल्याने शहरामध्ये अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. मात्र सदर व्यवस्था सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासन व वाहतूक विभागाला अपयश आले आहे.

चंद्रपूर शहराची झपाट्याने वाढ होत आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरामध्ये ऑटोरिक्षाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत चंद्रपुरात ३६०० च्या जवळपास अ‍ॅटोरिक्षा आहेत. त्यातही दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच दुचाकी व चारचाकी वाहनाची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

चंद्रपुरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून रस्ते पुन्हा अरुंद केले आहे, तर शहरातील गांधी चौक, जटपुरा गेट, गिरणार चौक, रामनगर चौकातील मार्गावर अनेक बेलगाम अ‍ॅटो थांबून असतात. तसेच प्रवासी पाहून अनेक ठिकाणी अ‍ॅटोचालक अ‍ॅटो थांबवितात. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. मात्र ऑटोचालकांवर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अ‍ॅटोचालक बिनदिक्कतपणे रस्त्यावर ऑटो थांबवित आहेत. याकडे स्थानिक प्रशासनांनी व वाहतूक विभागांनी कार्यवाही करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

बॉक्स

अनेक ऑटोचालकांकडे परमिटच नाही

चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस अ‍ॅटोरिक्षाची संख्या वाढत आहे. सद्यास्थित शहरामध्ये ३६००च्या जवळपास अ‍ॅटोरिक्षा आहेत, तर अनेक ऑटोरिक्षाचालकांकडे परमिट नसतानासुद्धा सर्रास अ‍ॅटो चालवित आहेत, तर अनेकजण एकाच परमिटवर दोन ते तीन अ‍ॅटो चालवित आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

बॉक्स

वाहनतळ वाढविण्याची मागणी

चंद्रपुरातील ऑटोचालकांना ५७ अधिकृत वाहनतळ ठरवून देण्यात आले आहेत. त्यामध्ये बसस्थानक चौक, रेल्वे स्टेशन, गिरणार चौक, रामनगर, बांग्ला चौक, सरकारी दवाखाना, गांधी चौक, बंगाली कॅम्प यांसह अनेक मुख्य चौकांचा समावेश आहे. मात सदर वाहनतळ अपुरे पडत असल्याने दुप्पट अधिकृत वाहनतळ देण्याची मागणी ऑटोचालकांकडून होत आहे.

बॉक्स

प्रवाश्यांची लूट

ऑटो संघटनेने शहरातील दर निश्चित केले आहे. मात्र अनेक ऑटोचालक या नियमांचे उल्लघन करून प्रवाश्यांकडून अतिरिक्त दर आकारत आहेत. अनेकदा नवखा प्रवाशी हेरून अ‍ॅटोचालक त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकडत असतात. तसेच डिझेल व पेट्रोलचे दर वाढले असे कारण पुढे करून लूट करतात. यावर निर्बंध लादण्याची मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.

Web Title: Uncontrolled parking of autorickshaws is a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.