ग्रामीण भागात अघोषित फटाकेमुक्त दिवाळी
By Admin | Updated: November 4, 2016 01:20 IST2016-11-04T01:20:12+5:302016-11-04T01:20:12+5:30
दिवाळी म्हटलं तर शहरांसह ग्रामीण भागातील लोकांसाठी वर्षातील अतिशय महत्त्वाचा सण असून यावेळी बाजारात खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

ग्रामीण भागात अघोषित फटाकेमुक्त दिवाळी
व्यापाऱ्यांनाही फटका : शेतकऱ्यांच्या आर्थिक अधोगतीचा परिणाम
कोरपना : दिवाळी म्हटलं तर शहरांसह ग्रामीण भागातील लोकांसाठी वर्षातील अतिशय महत्त्वाचा सण असून यावेळी बाजारात खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे दिवाळीचा सण सुरु असल्याची जाणीव होते. मात्र यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात उलट चित्र असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अघोषित फटाकेमुक्त दिवाळी सुरु असल्याचे जाणवत आहे.
एरवी दिवाळीच्या सणात बाजारपेठेत इतका शुकशुकाट आढळत नव्हता. शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस काढला नाही. तसेच ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून शासनाकडून कसलाही आर्थिक आधार मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीवर पडला असून व्यापारी प्रभावित झाले आहेत. वस्तूला मागणी नसल्यामुळे बाजारपेठेतील विक्री क्षमता निम्म्यावर आली असून व्यापाऱ्यांसाठी ‘बुरे दिन’ असल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे. फटाका फोडल्याने काही फायदा होत नसला तरी फोडणाऱ्याला आनंद मिळतो. त्यातल्या त्यात फटाके फोडल्याशिवाय दिवाळीचा सण साजरा केल्यासारखे वाटत नसणारा वर्ग मोठा आहे. मात्र आर्थिक चणचण फटक्याच्या खरेदीला आड येत आहे. फटाके फोडण्याची इच्छा असूनही खरेदीक्षमता नसल्याने अनेकांना फटाके फोडण्याची मजा घेता आली नाही. बाजारपेठेत मंदी असल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)
लोकांच्या हातात पैसा नसल्याने या दिवाळीत जवळपास सर्वच व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाले. ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे ते लोक आॅनलाईन खरेदीकडे वळले आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूसह अनेक वस्तूंना बाजारात मागणी राहिली नाही. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा धंदा निम्म्यावर आल्याने आम्हा व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
-मो. सलीम मिठानी, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक, गडचांदूर
दिवाळीतील मंदीमुळे कापड व्यावसायिकसुद्धा प्रभावित झाले असून लक्ष्मी पूजन व भाऊबीज या फक्त दोनच दिवस व्यवसाय व्यवस्थित चालला. दरवर्षी दहा-पंधरा दिवस चालणारा व्यवसाय यावर्षी मात्र दोन दिवसांवर येऊन पोहचला. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांचीही दिवाळी अंधारातच चालली आहे.
-हंसराज चौधरी, कापड व्यावसायिक, गडचांदूर