विनाअनुदानित शिक्षकांनी पाळला ‘काळा दिन’

By Admin | Updated: September 6, 2015 00:50 IST2015-09-06T00:50:26+5:302015-09-06T00:50:26+5:30

शिक्षक दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा परिषदेत आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण सुरू असताना चंद्रपूर जिल्हा परिषद परिसरात विरोधाभास पाहावयास मिळाला.

Unaided teachers keep 'black day' | विनाअनुदानित शिक्षकांनी पाळला ‘काळा दिन’

विनाअनुदानित शिक्षकांनी पाळला ‘काळा दिन’

जि.प. परिसरात विरोधाभास : एकीकडे पुरस्कार तर दुसरीकडे निदर्शने
चंद्रपूर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा परिषदेत आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण सुरू असताना चंद्रपूर जिल्हा परिषद परिसरात विरोधाभास पाहावयास मिळाला. सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा साजरा होत असताना बाहेर परिसरात विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचे धरणे चालु होते.
मागील कित्येक वर्षांपासून विनाअनुदानित शाळेत विनापगारी काम करणाऱ्या शिक्षकांकडून शासनाकडे मागणी सुरू आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्य शासनाचा विरोध म्हणून संपुर्ण राज्यभरातील उच्च माध्यमिक शिक्षकांनी ५ सप्टेंबर हा ‘काळा दिवस’ पाळला. या अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेतही जिल्ह्यातील शिक्षकांनी आंदोलन केले.
विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीने आतापर्यंत १३३ आंदोलने केलीत व सगळ्याच मार्गानी आंदोलने झालीत पण सरकारकडून दाद मिळाली नाही. यामुळे विनाअनुदानित शिक्षक वर्गात संताप व्यक्त होत होता. (जिल्हा प्रतिनिधी)
मुनगंटीवारांपुढे घोषणाबाजी
जिल्हा परिषदेतील शिक्षक पुरस्कार समारंभासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आगमन झाले, तेव्हा प्रांगणात विनाअनुदानित शिक्षकांचे धरणे सुरू होतेच. पालकमंत्र्यांचे वाहन दिसताच या शिक्षकांनी विरोधात घोषणाबाजी केली. शिक्षकांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र कसलाही प्रतिसाद न देता ते समारंभासाठी सभागृहात गेले.

Web Title: Unaided teachers keep 'black day'