जिवती : शेणगाव येथे शनिवारी शेजारच्या २१ वर्षीय युवकाने दोन वर्षीय चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी जिवती पोलिसांनी आरोपी आकाश पवार याला अटक केली आहे.
आरोपी हा शेजारीच राहणारा असून, त्याचे कुटुंब हे पीडित मुलीच्या आजोबांचे शेत अर्धवटीने करायचे. आरोपी आकाश पवार यांनी पीडित मुलीला बाहेर फिरवण्याच्या बहाण्याने दुचाकीवर नेले. मुलीच्या घरच्यांनाही त्याच्यावर विश्वास केला. त्यानंतर या नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचार करून घरी सोडल्यावर कुटुंबीयांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. सदर चिमुकलीला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली. रामनगर पोलिसांनी जिवती पोलिसांच्या साहाय्याने आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस विभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर येथील पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे करीत आहेत.